आदर्श शेतकरी मल्हार कुंभार यांचा स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान

Spread the love

जळगाव जिल्ह्यातील युवा आदर्श शेतकरी मल्हार कुंभार यांच्या शेती, माती व शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याची दखल घेऊन स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व सिने अभिनेते श्री. दिपक शिर्के यांच्या हस्ते मल्हार कुंभार यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी मा. आ. नितीन पवार, डॉ.प्रमोद रसाळ यांच्यासह आदर्श शेतकरी उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.

चांगली पगाराची नोकरी सोडून केला काळ्या आईच्या सेवेचा निर्धार…


युवा आदर्श शेतकरी मल्हार कुंभार यांचे शिक्षण कृषी पदवीपर्यंत झाले असून वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. शेतकरी समृद्ध व्हावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी शासनातर्फे अनेक लाभदायी योजना राबविल्या जातात. शासकीय योजनांचा लाभ घेऊन पारोळा तालुक्यातील चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत युवा शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत त्यांना कृषीपंप, ठिबक, शेततळे आणि त्या माध्यमातून मत्स्यपालन, फळबाग, बांधावर बांबू लागवड, सेंद्रिय गांडूळ खत युनिट, शेतकरी गटाला अवजार बँक, रेशीम उद्योगासाठी तुती लागवड केली आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत शेतीचे योग्य नियोजन केल्यामुळे दरवर्षी चार हेक्टर क्षेत्रात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या योजनेबद्दल इतर शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करत असून गावातील अनेक शेतकरी शासनाच्या योजनांचा लाभ होत आहे.

या योजनांचा घेतला आहे लाभ…


अटल सौरपंप योजनेअंतर्गत सौरपंप मिळवत त्यांनी वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्येवर मात केली आहे. पोकरा योजनेंतर्गत शेततळे, त्या माध्यमातून मत्स्यपालन सुरू करत दुहेरी उत्पन्न सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा समूह तयार करून अवजार सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीसाठी यंत्र अत्यंत माफक दरात पुरविण्याचे काम या माध्यमातून सुरू असून अजून अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग सुरू आहेत.

स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान झाल्यामुळे मला एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. कुठेतरी मोठ्या लोकांनी कामाची दखल घेतल्यामुळे अजून जोमाने काम करण्याची शक्ती मिळाली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करून त्यांना आधुनिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करू – युवा आदर्श शेतकरी मल्हार कुंभार

हे वाचलंत का ?

टीम झुंजार