अमळनेर | प्रतिनिधी :- पत्र्याच्या शेडचा पत्रा काढून रात्री अज्ञात चोरट्याने मजुराच्या घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यासह ६२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना देवळी शिवारात नवकार स्टोन क्रशर वर घडली.
संजय जयसिंग यादव हा देवळी परिसरातील नवकार स्टोन क्रशर वर मजुरीचे काम करतो. ७ रोजी त्याने आपल्या पत्र्याच्या शेड वजा झोपडीला पत्रा आडवा लावून झोपला होता. सकाळी सात वाजता तो उठला असता घरातील तीन पत्र्याच्या पेट्या व मोबाईल आढळून आला नाही. त्याने आजूबाजूला शोध घेतला असता देवळी गावाच्या फाट्याजवळ पेट्या व त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
२७ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ,कानातले व दागिने ,चांदीचे दागिने तसेच मोबाईल आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण ६२ हजार ४०० रुपयांचा माल चोरून नेल्याचे उघडकीस आले. संजय यादव याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील रामदास पाटील करीत आहेत.