मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची खूप इच्छा होती. मात्र आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
कारण एका दशकानंतर हे क्युट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र झळकणार आहे. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव ‘जर तर ची गोष्ट’ असे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील.
रंगमंचावर एकत्र काम करण्याबाबत प्रिया बापट म्हणते, ”हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक आहे. आपलंच प्रॉडक्शन असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि तेही आपल्या आवडत्या सहकलाकारासोबत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा माझा हट्ट आणि इच्छा होती की माझं पुढील नाटकही उमेशसोबतच असावे. यासाठी आम्ही फार वाट पाहिली. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. अतिशय प्रेमाची आणि हक्काची माणसं या नाटकाशी जोडली गेली आहेत. आता लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची उत्सुकता आहे.”

तर उमेश प्रियासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल म्हणतो, ”नाटक हे माझं पहिलं प्रेम आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील माझं प्रेम असं एकत्र मी माझ्या नवीन नाटकात जगणार आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकानंतर आम्ही एकत्र एक चित्रपट केला, वेबसीरिज केली. परंतु त्यानंतर असं वाटत होतं की एकत्र नाटक कधी करणार? आणि आता हा योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे सोनल प्रॅाडक्शन सोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.”
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.