एरंडोल विधानसभा मतदार संघातील २८ कोटी रुपयांच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी.-आमदार चिमणरावजी पाटील.

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल :- एरंडोल विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामांसाठी तसेच पुलांच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.रस्त्यांच्या कामांमुळे तसेच नवीन पुलांच्या बांधकामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामांची घौडदौड आगामी काळात देखील वेगाने सुरु राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एरंडोल मतदार संघातील एरंडोलसह,पारोळा,भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.तसेच नदी व नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात अनेक गावांशी संपर्क तुटत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे शिक्षण,आरोग्य,दळणवळण यासारख्या समस्या निर्माण होत होत्या.पारोळा तालुक्यातील लोणीसिम,लोणी बुद्रुक,लोणी खुर्द,मोंढाळे प्र.अ.,करमाड या गावांना पूल नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते.मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात मतदारसंघातील कामांसाठी सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.पारोळा तालुक्यातील भोंडण गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले आहेत.तसेच तालुका हद्द ते ढोली मार्गावर पुलासाठी दोन कोटी रुपये,उंदीरखेडे गावाच्याजवळ पूल बांधकामासाठी दीड कोटी रुपये,लोणी बुद्रुक,लोणी सिम व लोणी खुर्द या तिन्ही गावांना जोडणा-या पूलासाठी दीड कोटी रुपये, मोंढाळे प्र.अ.गावास जोडणा-या पुलासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

करमाड कुंझर रस्त्यावरील पूल बांधकामासाठी दोन कोटी रुपये,आंचळगाव येथे पूल बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एरंडोल तालुक्यातील विखरण रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी वीस लाख रुपये,खर्ची ते नागदुली रस्त्यावरील लहान पुलासाठी ७५ लाख रुपये, रिंगणगाव ते खर्ची रस्त्याच्या कामासाठी ७५ लाख रुपये,तळई ते उत्राण रस्त्यावर लहान पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये,एरंडोल येथील धरणगाव चौफुली ते टोळी गावापर्यंत रस्ता रुंदीकरण व मोरीच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

भडगाव तालुक्यातील अंजनविहीरे ते गिरड रस्त्यावरील पुलासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये,पिंपरखेड ते आंचळगाव रस्त्याचे रुंदीकरण करणे एक कोटी पन्नास लाख रुपये,आमडदे ते आंचळगाव रस्त्यावरील पाईप मो-यांच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये,धोत्रे गावाजवळ लहान पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी पन्नास
लाख रुपये,आमडदे गावाजवळ लहान पुलाचे बांधकामासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.पुरवणी अर्थसंकल्पात मतदार संघातील पूल आणि रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या दूर
होण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार