मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका निस्वार्थी माणसाने आपले १०० वे रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
इंडिअन मेडिकल असोसिएशन आणि सर के. ई. एम. रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात डॉक्टर प्रागजी वाजा यांनी आज दादर येथे रेल्वे पुलावर आपले १००वे रक्तदान केले. विशेष म्हणजे आज डॉक्टरांचा ६३वा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या हितचिंतकांसाठी हा एक दुग्धशर्करायोग ठरला.
६३ वर्षांच्या युवकाने १९९२ मध्ये पहिल्यांदा रक्तदान केले होते आणि इतरांनाही असेच करण्यास प्रोत्साहित केले. तेव्हापासून सलग २४ वर्ष डॉक्टर वाजा यांनी जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत आपले योगदान चालू ठेवण्याचे वचन दिले.
डॉक्टर वाजा म्हणाले, “समाजासाठी, मानवासाठी मी काहीतरी करू शकत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. प्रत्येक रक्तदानानंतर मला आतून खूप छान वाटते. अगदी ताजंतवानं वाटतं. मला हे करण्यात आनंद आहे, परंतु मी सर्वांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, मी कधीही १०० रक्तदानाचा टप्पा पार करेन अशी अपेक्षा केली नव्हती.
“तथापि, मला शक्य तिथे मदत करणं मला आवडतं म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे तोपर्यंत मी हे कार्य पुढे चालू ठेवीन.” डॉक्टर पुढे म्हणाले, “बरेच लोक अवयवदाता आहेत आणि त्याबद्दल अनेकदा बोलले जाते, अवयवदान केलेच पाहिजे आणि त्यासाठी लोकांना प्रोत्साहितही केले पाहिजे. तथापि, खरोखरच पुरेसे रक्तदाते नाहीत. रक्तदानासाठीही लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. रक्तदान करणे अगदी सोपे आहे. फक्त काही मिनिटांत आपण तीन बहुमूल्य जीव वाचवू शकता.”
डॉक्टर वाजा यांच्या शतकोत्सवी समारंभासाठी वैद्यकीय क्षेत्रातले डॉ. अनिल आव्हाड, डॉ. विद्या पासी, डॉ. अरवींद जैन, डॉ. गुप्ता यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार अजय चौधरी, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक दत्ताराम पोंगडे, सचिन पडवळ, लताताई रहाटे, लालबागच्या राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानदसचिव सुधीर साळवी, भाजपचे वॉर्ड अध्यक्ष गणेश शिंदे आणि पदाधिकारी, मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सोनल खानोलकर तसेच आचार्य ९०एफएमचे डॉ. राहुल भांडारकर यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर भांडारकर म्हणाले की, डॉक्टर वाजा यांचे समाजकार्य आणि रक्तदानासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. यापूर्वी २५, ५० आणि ७५ रक्तदानाचे टप्पे गाठल्याबद्दल अनेकांनी त्यांची प्रशंसा केली होती, पण आज १००व्या टप्प्यावर मला हजर रहाता आलं आणि दिव्य अनुभूती घेता आली. डॉक्टरांच्या अविश्वसनीय समर्पण आणि वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
जीटीबी नगर येथील गुरुु नानक महाविद्यालयाच्या एनएसएसच्या ब्रिंदा व्यंकटेश, नविथा थांगदुराई, अंकिता गुप्ता, बिनिता गुप्ता, सानिका कुडतरकर, प्रतिक तिवारी, कौस्तुभ मांद्रे, अनुषा मटारपरती, सोनिया प्याटा, समीर शेख, नूरजहांन शेख, अंशदा दोनतळे, आदित्य गुप्ता, अंकित, सुनयना प्रजापती, निखिल शर्मा, इब्राहिम शेख, अनुराधा तिवारी विद्यार्थ्यांनी रक्तदात्यांना शिबिराची माहिती दिली आणि रक्तदानास प्रोत्साहित केलं. त्यामुळे दिवसभरात १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यात २१ महिलांचाही समावेश होता.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!