मारवड पोलिसांतला “माणूस”जागृत होऊन माणुसकीतून धार येथील आत्महत्याग्रस्त हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

Spread the love

मदत स्वीकारताना वृद्ध आई व विधवा पत्नीला अश्रू अनावर , पोलिसांनी दिला धीर ,मुलांना शाळेत पाठवा आम्ही मदत करू –मारवड पोलीस

मारवड पोलिसांचे सर्व थरातून कौतुक

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील धार येथील बिकट परिस्थिती असलेल्या आत्महत्याग्रस्त मजुराच्या कुटुंबीयांना मारवड पोलिसांनी मदतीचा हाथ दिला असून खाद्यसामुग्री विधवा महिलेच्या ताब्यात देत ,मुलांना गोडधोड खाऊ , खाऊ घालून धीर दिला आहे ,तसेच कुटुंबातील मुलांना शाळेत पाठवा मदत आम्ही करू पण त्यांना शिकवले पाहिजे असे ही उपस्थित पोलिसांनी सांगत अश्रू अनावर झालेल्या वृद्ध आई व पत्नीला धीर दिला, या कार्यामुळे पंचक्रोशीतून व तालुक्यात मारवड पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत अधिकवृत असे की तालुक्यातील धार येथील बापू दयाराम भिल याने २१ रोजी स्वतःच्या राहत्या घरी छताला साडी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपवली होती. त्याच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार असून संपूर्ण कुटुंबाची गुजराण हातमजुरीवर असल्याने वयोवृद्ध आई, पत्नी व चार मुलांवरसंसाराचा गाडा हाकण्याची वेळ येवून ठेपली आहे ,बिकट परिस्थिती वृत्त आजी व विधवा महिलेवर आल्याचे पाहून बिकट परिस्थिती साथ देण्यासाठी मारवड पोलिसांनी धीर देत ओढवली परिस्थितीत मदतीचा हात देऊ केला असल्याने मृत कुटुंबातील सदस्य भावनिक होऊन अश्रू अनावर झाले होते .

मृत बापू भिल याने गळफास घेतल्यावर मयताच्या शवविच्छेदनावेळी ही बिकट परिस्थिती पोलीस हवालदार सुनील तेली यांच्या लक्षात आली. पती मृत झाला आणि घरात दोन वेळचे खायला अन्न ही नाही , किराणा ही नसल्याने स्वतःच्या आणि मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणापुढे हात पसरावे ह्या विवंचनेत त्याची पत्नी होती, त्या कुटुंबीयांची ही कैफियत हवालदार सुनील तेली यांनी मारवड पोलीस ठाण्यात एपीआय शितलकुमार नाईक यांना सुनावली असता त्यांनी मारवड पोलिसांतर्फे मदत करण्याचा निर्णय घेतला व काल दिनांक २४ रोजी धार येथे जात एका महिन्याचा किराणा ,खाद्यसमुग्री ज्योती बापू भील यांना सुपूर्त केला.

तसेच सपोनि नाईक यांनी रोख स्वरूपात ही मदत केली. यावेळी एपीआय शितलकुमार नाईक, हवालदार सुनील तेली, पोलीस नाईक फिरोज बागवान, पत्रकार डॉ. विलास पाटील,धारचे पोलीस पाटील जगतराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर मयताच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी व चार मुले एवढे कुटुंब उरले असून मयताच्या वडिलांनी ही दोन वर्षापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. समाजातील दानशूर दात्यांनी ही या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन एपीआय शितलकुमार नाईक यांनी झुंजार प्रतिनिधी कडे व्यक्त केली.

टीम झुंजार