डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जात असल्याचे पाहून पतीने खूप आरडाओरड केली होती, पण गळफास इतका घट्ट बसला होता की, काही मिनिटात तिने प्राण सोडले
सोलापूर :- डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडताना म्हणजेच फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकला. त्यामुळे गळफास बसल्याने पतीदेखत पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला.
डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जात असल्याचे पाहून पतीने खूप आरडाओरड केली होती, पण गळफास इतका घट्ट बसला होता की, काही मिनिटात पत्नी जागेवरच गतप्राण झाली. प्रियांका प्रवीण येलपले (वय २९ वर्ष, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतातील डाळिंबाच्या रोपांना फवारणी करत होते
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडत होते. प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते. पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या.इतक्यात ब्लोअर ढवळणी रॉडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले.
ट्रॅक्टर जाम झाल्याने प्रवीणच्या लक्षात आले……
प्रवीण येलपले हे पुढे पाहत ट्रॅक्टर चालवत होते. डाळिंबाच्या रोपांना औषध सोडताना अचानकपणे ट्रॅक्टर जाम झाले. पत्नीचा साडीचा पदर अडकून पत्नी प्रियांका तडफडत होती. गळफास घट्ट बसल्याने प्रियांकाला ओरडता देखील आले नव्हते.प्रवीण यांनी ताबडतोब ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरिता तिला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.