पायी कावड यात्रेला गेलेल्या एकाच परिवारातील तीन युवकांच्या नदीच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू,

Spread the love

एरंडोल शहरावर शोककळा,दोघांचे मृतदेह सापडले, एक मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफ टीम नदीकाठी दाखल.

एरंडोल :- येथून आज पहाटे तीन वाजता सुमारे दोनशे युवकांनी एरंडोल ते रामेश्वर अशी पायी कावड यात्रा काढली होती.शहरातून भव्य शोभायात्रा काढून युवक कावड यात्रेत सहभागी झाले होते.पहाटे तीन वाजेच्या सुमारास कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवकांनी खोल महादेव मंदिरासह कावड यात्रेवरील मार्गावर असलेल्या मंदिरात आरती करून हर हर महादेवच्या घोषणा दिल्या होत्या.

सर्व कावडधारी यात्रेकरू अत्यंत आनंदात पायी चालत होते.दुपारी तीन वाजेच्या सुमारास कावड यात्रा रामेश्वर येथे पोहोचली.रामेश्वर येथील मंदिराजवळ असलेल्या तापी,गिरणा आणि अंजनी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आंघोळ करण्यासाठी कावडयात्रेतील युवक गेले होते.मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह पाहून अनेक युवक नदीच्या पात्रातून बाहेर आले.त्रिवेणी संगमाजवळ
अक्षय उर्फ भय्या प्रवीण शिंपी हा बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचेबचुलत भाऊ सागर अनिल शिंपी,पियुष रवींद्र शिंपी यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला

मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे तिघेही युवक पाण्याच्या पात्रात बुडू लागले.कावड यात्रेतील तीन युवक बुडत असल्याचे लक्षात येताच कावड यात्रेतील सहभागी युवकांनी प्रत्येकाच्या गळ्यात असलेले भगवे रुमाल एकमेकांना बांधून ते नदीच्या पात्रात फेकले आणि युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे युवकांना वाचवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.कावड यात्रेतील युवक पाण्यात बुडाल्यामुळे सर्वांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.यात्रेतील युवकांनी जोरजोरात आरोळ्या मारल्यामुले रामेश्वर
पळसोदचे सरपंच पंकज पाटील,उपसरपंच हिम्मत पाटील,पोलीस पाटील टिकाराम पाटील यांचेसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून नदीत पट्टीचे पोहणारे यांना बोलावून मदतकार्य सुरु केले.

आमदार चिमणराव पाटील यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती देवून मदत कार्य त्वरित सुरु करण्याचे सांगितले.भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर यांनी पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके,प्रदीप पाटील यांचेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यानंतर दोघांनीही पदाधिका-यांसह घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु केले.गावातील पट्टीच्या पोहणा-या युवकांनी नदीच्या पात्रात उड्या मारून युवकांचा शोध घेतला.शोधकार्य सुरु असतांना सागर अनिल शिंपी या युवकाचा मृतदेह सापडला त्यानंतर पियुष रवींद्र शिंपी याचा मृतदेह सापडला.

तिसरा युवक अक्षय प्रवीण शिंपी हा अजून सापडला नाही त्याच्या शोध घेण्यासाठी धुळे येथून एन डी आर एफ टीम रामेश्वर नदी काठी दाखल झाली आहे. परंतु रात्र झाल्यामुळे शोध कार्याचे काम सुरू झाले नाही सकाळी शोध कार्या सुरू करणार आहेत.नदीच्या पात्रात बुडालेले तीनही युवक अविवाहित असून सख्खे चुलत भाऊ आहेत.तिघेही युवक नदीच्या पात्रात बुडाल्याची माहिती शहरात समजताच सर्वत्र शोककळा पसरली. तिघेही युवक भगवा चौक परिसरातील रहिवासी असल्यामुळे शहरातील मेनरोडावरील व्यावसायिकांनी दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद केली.

दरम्यान युवक बुडाल्याचे समजताच आमदार चिमणराव पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,किशोर निंबाळकर,माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील,जगदीश ठाकूर,बाळासाहेब पाटील,बबलू चौधरी,शिवसेनेचे शहरप्रमुख (उद्धव ठाकरे गट) कुणाल महाजन,नाना वाणी, शाम जाधव,यांचेसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी दाखल झाले.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील हे देखील मुंबई येथून पदाधिका-यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेत होते.

पियुष शिंपी हा पुणे येथे खाजगी कंपनीत तर सागर शिंपी हा मुबई येथील कंपनीत कामाला होते आणि कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी ते एरंडोल येथे आले असतांना दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला.मयत झालेले तीनही युवक अविवाहित असून एकाच परिवारातील असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.तिघाही युवकांच्या परिवाराचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू अनावर झाले होते तर कावड यात्रेत आपल्या सोबत आलेले तीन सहकारी बुडाल्यामुळे सर्व कावडयात्री शोकमग्न झाले होते.

हे पण वाचा

टीम झुंजार