जामनेर तालुक्यात रेकी करून ढाब्यावर सशस्त्र दरोडा, पोलिसांच्या तत्परतेमुळे 8 सराईत गुन्हेगार असलेल्या दरोडेखोरांना अटक.

Spread the love

पोलिसांनी एक गावठी पिस्तूल,तीन जिवंत काडतूस, चॉपर आणि गुप्तीसह रोकड रक्कम केली जप्त.

प्रतिनिधी | जामनेर
जामनेर बोदवड रोडवरील नवी दाभाडी फाट्या जवळील एका ढाब्यावर बुधवारी रात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. याबाबतची माहिती मिळतात जामनेर पोलिसांनी सूत्रे हलवून दरोडेखोरांना तासाभरातच मुक्ताईनगर हद्दीत जेरबंद करण्यात आले. त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तूल एक चॉपर आणि एक गुप्ती जप्त करण्यात आली.

जामनेर बोदवड रोडवरील वाडी फाट्याजवळ निर्जन ठिकाणी एकाकी ढाबा आहे. या ढाब्यावर काही लोक बसले असताना काही अंतरावर ईरटीगा ही चार चाकी गाडी लावून चार जण पायी चालत ढाब्यावर आले. त्यांच्यापाठोपाठ आणखी चार जण येऊन त्यापैकी एकाने व्यवस्थापक असलेल्या रवींद्र वाघ यांच्या डोक्याला पिस्तूल लावून गल्ल्याची चावी मागितली. चावी न दिल्याने त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली. तर दुसऱ्या एकाच्या मानेवर सुरा ठेवून इतरांकळूनही असलेली दीड लाखाच्या जवळपास रक्कम घेऊन दरोडेखोर बोदवडकडे पसार झाले.

मुक्ताईनगर जवळ जेरबंद
याबाबत ढाबा मालक यांनी जामनेर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जामनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ बोदवड मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच नाकाबंदी करण्यात येऊन सदरील आरोपींना मुक्ताईनगर हद्दीत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले.

सराईत गुन्हेगार
जामनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मुकेश फकीरा गणेश, शेख भुरा शेख बशीर शेख शरीफ शेख सलीम शाहरुख शहा चांद शहा अझरुद्दीन शेख अमीनुद्दीन अंकुश तुळशीराम चव्हाण खजिनदार सिंग कुलबीर सिंग रीन, शेख नय्युम शेख कयूम अशा आठ जणांना ६९,६५० रुपये रोकडसह पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, ईरटीगा, चोपर अशा अन्यसाहित्यासह मुक्ताईनगर पोलिसांनी जेरबंद करून आर्मअक्ट व दरोड्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.

गुप्ती लावताच लघुशंका
अचानक आलेल्या सात-आठ दरोडेखोरांनी पिस्तूल तलवार गुप्तीचा भाग दाखवून दहशत माजवली. यापैकी एकाने व्यवस्थापक रवींद्र वाघ याच्या डोक्याला पिस्तूल लावली. तर दुसऱ्याने जेवणासाठी बसलेल्या एका ग्राहकाच्या मानेवर गुप्ती ठेवताच भयभीत झालेल्या ग्राहकाने कपड्यांमध्येच लघुशंका केली. अवघ्या पाच मिनिटात गोंधळ घालून चोरटे पसार झाले.

पत्त्याचा क्लब
ढाब्याच्या नावाखाली या ठिकाणी पत्त्याचा क्लब चालतो. दोन दिवसांपूर्वी दरोडेखोरांपैकी दोघेजण या ठिकाणी पत्ता खेळण्याच्या बहाण्याने रेकी करून गेले. व बुधवारी रात्री नऊ वाजे दरम्यान अचानक दरोडा घातल्याची माहिती संबंधितांपैकी एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार