खळबळजनक! तळहातावर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे लिहून २४ वर्षीय विवाहितेने संपविले जीवन.

Spread the love

नालासोपारा – नालासोपाऱ्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या तळहातावर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे लिहून एका विवाहितेने आपले जीवन संपवलं आहे. संपूर्ण सुसाईड नोट हातावर लिहून २४ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं आहे. ही घटना निलेमोर गावात ही घटना घडली. संगीता कनोजिया असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पती नितीश कुमार, सासू आशा कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया आणि जाऊबाई माला कनोजिया अशी आरोपींची नावे आहेत. संगीता हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्वत:च्याच शरीरावर लिहिलं. माझ्या मृत्यूला माझा पती, सासू, सासरे आणि वहिनी जबाबदार असतील, असंही विवाहितेने लिहून ठेवलं. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

संगीताचे वडील मुन्नीलाल राजनारायण कनोजिया यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गळफास लावून घेण्याआधी संगीताने तळहातावर तिच्या मृत्यूचे कारण आणि आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या आरोपींची नावे लिहिली होती.
२०२२ मध्ये संगिताचं लग्न नितीश कुमार सोबत करून दिले होते. तेव्हा लग्नात ऐपतीनुसार हुंडा दिला.

मात्र लग्नानंतर सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी संगीताचा शारिरिक आणि मानसिक छळ सुरू केला. माहेरून पैसे आणण्याची मागणी करत तिला जेवणही दिले जात नव्हते. रोजच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप संगीताच्या वडिलांनी केला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार