मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे,अशी चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या.

Spread the love

हदगाव :- मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आपली आहुती दिली आहे. हदगाव तालुक्यातील शुभम सदाशिव पवार या 24 वर्षीय तरुणाने अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून मृत्युला कवटाळले. शुभम पवार हा प्लंबरचे काम करत होता आणि हदगाव तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी होता. काम करत करत तो शिक्षणही घेत होता. शनिवारी सकाळी तो मुंबईहून नांदेड येथे आला. वडिलांना फोन करून त्यांना बहिणीकडे फ्रेश होऊन गावाकडे येतो असे कळवले. मात्र तो घरी गेलाच नाही.

कुटुंबियांचा फोनही उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी तामसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशेन शोधले असता ते अर्धापूर परिसरात असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतली. अर्धापूर येथील नरहरी मंगल कार्यालयाजवळील झाडीत शुभमचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळ विषारी औषधाचा डब्बा, पावती आणि चिठ्ठी आढळली.एक मराठा लाख मराठा’, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे, माझे हे बलीदान वाया जाऊ नये’, असा मजकूर यात लिहिलेला होता.

पोलिसांनी शुभमचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवलाआहे. याप्रकरणी केशवराव पवार यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मस्के हे करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार