वाराणसी : सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून तर अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अशा असुरक्षित ठिकाणांमध्ये शाळा-महाविद्यालयांचाही समावेश होत आहे.उत्तर प्रदेशातील आयआयटी बीएचयूमध्ये अशीच एक भयंकर घटना घडली आहे.
आयआयटी बीएचयूच्या कॅम्पसमध्ये काही टवाळखोरांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि तिचं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संचालक कार्यालयाला घेराव घालून सुमारे 15 तास घोषणाबाजी केली. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी बीएचयूच्या पीडित विद्यार्थिनीला टवाळखोरांपासून आपली अब्रू आणि जीव वाचवण्यासाठी एका प्रोफेसरच्या घरात आसरा घ्यावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा आयआयटी बीएचयू कॅम्पसमधील न्यू गर्ल्स हॉस्टेलमधील एक विद्यार्थिनी फिरायला गेली होती. यावेळी तिची भेट आणखी एका विद्यार्थ्याशी झाली. त्यानंतर दोघेही एकत्र काही अंतर चालत गेले. दरम्यान, तिघे जण बुलेटवरून आले आणि त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना मारहाण करून एकमेकांपासून दूर केलं.
यानंतर तिन्ही टवाळखोरांनी विद्यार्थिनीला कॅम्पसच्या दुसऱ्या भागात नेलं आणि तिला तिचे कपडे काढण्यास भाग पाडलं. त्यांनी जबरदस्तीनं तिचं चुंबन घेतलं. एवढंच नाही तर आरोपींनी जबरदस्तीनं मुलीचे फोटो काढले आणि व्हिडिओदेखील बनवला. त्यांनी तिच्याकडून तिचा फोन नंबरही घेतला.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यानंतर पीडित विद्यार्थिनी आपला जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी एका प्रोफेसरच्या घरात शिरली आणि 20 मिनिटे तिथे लपून राहिली. तिनं रात्री उशिरा प्राध्यापकांना जागं करून या घटनेची माहिती दिली आणि मदतीची विनंती केली. प्राध्यापकानं तत्काळ सुरक्षा समितीला याची माहिती दिली आणि विद्यार्थिनीला सुरक्षा रक्षकांसह सुरक्षितपणे तिच्या वसतिगृहात सोडलं. या घटनेबाबत पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेली माहिती जास्त आश्चर्यकारक आहे.
विद्यार्थिनीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ती एका विद्यार्थ्यासोबत फिरत असताना मागून दुचाकीवरून तीन तरुण आले आणि आराडाओरडा करू नये म्हणून दोघांना वेगळं केले. यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा मोबाईलही हिसकावून घेतला. विद्यार्थिनीनं त्यांच्यापासून स्वत:ची सुटका करून तेथून पळ काढला. तरीही तिला बुलेट पाठलाग करत असल्याचा आवाज आला. जीव वाचवण्यासाठी ती एका प्राध्यापकाच्या घरात घुसली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला असून ती वसतीगृहातून बाहेर पडण्यास घाबरत आहे. या प्रकरणात तिचा सहकारी विद्यार्थीही जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

कॅम्पसमध्ये इंटरनेट बंद
सकाळी इतर विद्यार्थ्यांना या घटनेची माहिती मिळताच आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. कॅम्पस सुरक्षित करा आणि आरोपींना अटक करा या मागणीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी संचालक कार्यालयाला घेराव घालून आंदोलन सुरू केलं. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ लाइव्ह करून इतर विद्यार्थ्यांचीही मदत घेतली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला वसतिगृहातील इंटरनेट बंद करावं लागलं.
सुमारे 15 तास चाललेल्या निदर्शनानंतर आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस आणि संचालकांनी आश्वासन दिलं की, बीएचयू आणि आयआयटी-बीएचयू कॅम्पसमध्ये सीमारेषा तयार केली जाईल आणि कॅम्पस सुरक्षित केला जाईल. एवढेच नाही तर गुन्हेगारांनाही लवकरच अटक करण्यात येणार असून कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शन मागे घेतलं.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






