साक्री :- धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागले आहे. डीजेच्या तालावर थिरकताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
या राड्यात सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे सगळीकडे धुलिवंदनाचा सन उत्साहात साजरा होत असतांना साक्री शहरातील तरुण धुलिवंदन उत्सव डीजेसमोर नाचत साजरा करत होते. याचवेळी दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला.
काही तरुणांनी थेट धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार केले. या हाणामारीमध्ये जवळपास सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महिलांचा देखील सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.हल्ल्यातील सर्व जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वाद वाढल्यानंतर डीजेदेखील घटनास्थळी फोडण्यात आला. पोलीस प्रशासनातर्फे यासंदर्भात साक्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.







