वानराच्या मृत्यूमुळे भालगाव ग्रामस्थांनी दिवाळी साजरी न करता पाळला दुखवटा; चारशे ग्रामस्थांनी केले मुंडन.

Spread the love

एरंडोल :- भालगाव (ता.एरंडोल) येथे विजेचा धक्का बसून वानराचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांनी वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.वानरास श्रद्धांजली म्हणून तसेच कुटुंबातील सदस्य म्हणून गावातील सर्व ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली नाही.वानराचे धार्मिक पद्धतीने उत्तरकार्य करून लोकवर्गणीतून सुमारे तीन हजार नागरिकांना अन्नदान करण्यात आले.तसेच चारशे ग्रामस्थांनी मुंडन करून
गावात पाच दिवस दुखवटा पाळण्यात आला.

प्रभूरामचंद्रांचे सैनिक म्हणून वानरांकडे पाहिले जाते.भालगाव येथे ८ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता श्रीविठ्ठल मंदिराजवळ विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू झाला.विजेच्या शॉकने वानराचा मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करून झालेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला.ग्रामस्थांनी एकत्र येवून वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन केले.गावातील युवकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली.गावातून वाजतगाजत अंत्ययात्रा काढण्यात आली.यामध्ये स्थानिक भजनीमंडळाचे सदस्य
देखील सहभागी झाले होते.अंत्ययात्रेत सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दिवाळीपूर्वी वानराचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.मयत वानर गावातील झाडांवर राहत असल्यामुळे ग्रामस्थ त्यास परिवारातील सदस्य मानत होते.वानराच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांनी दुखवटा म्हणून दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्ष अंमलात आणला. दिवाळीत गावात कोणतीही विद्युत रोषणाई करण्यात आली नाही अथवा फटाके फोडण्यात आले नाहीत.पाच दिवस दुखवटा पाळल्यानंतर रविवारी लक्ष्मी.पूजनाच्या दिवशी वानराचे धार्मिक आणि विधिवत विधी करून उत्तरकार्य करण्यात आले.

सुमारे चारशे ग्रामस्थांनी सामुहिक मुंडन करून वानरास श्रद्धांजली वाहिली, यामध्ये युवक व शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.उत्तरकार्याच्या दिवशी भालगावसह पातरखेडे,बोरगाव,नंदगाव यासह परिसरातील सुमारे तीन हजार नागरिकांना अन्नदान करण्यात आले.भालगावचे नवनिर्वाचित सरपंच गोविंदा मराठे यांनी शी-यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध
करून दिले.तसेच अन्नदानाचा खर्च सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आला.पंचायत समितीचे माजी उपसभापती देविदास मराठे,

विकास संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील,माजी अध्यक्ष श्रीराम मराठे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास चव्हाण, पोलीस पाटील रमेश मराठे,माजी सरपंच नारायण सपकाळे,ग्रामपंचायत सदस्य किरण मराठे,ईश्वर
मराठे,छोटू मराठे,ज्ञानेश्वर मराठे,लोटन पाटील,कैलास मराठे,भास्कर मराठे,प्रभाकर मराठे,धुडकू पाटील,शंकर भिल,शालिक पारधी,सुकलाल ठाकूर,नाना महाजन, रवींद्र शिंदे यांचेसह ग्रामस्थ व युवक मंडळाच्या सदस्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.भालगाव येथील ग्रामस्थांनी राबवलेल्या उपक्रमाचे वन्यजीव प्रेमींनी स्वागत केले असून सर्वांनी प्राण्यांवर
प्रेम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार