केलेल्या कामाचे 10 टक्के प्रमाणे 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच व त्याचे पतीअँन्टी करप्शनच्या जाळ्यात.

Spread the love

अहमदनगर :- शासकीय कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामाचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी एकूण बीलाच्या 10 टक्के प्रमाणे 40 हजार रुपये लाच स्वीकारताना श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचासह त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.23) कोकणगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सापळा रचून केली. महिला सरपंच उज्वला सतिष रजपूत (वय 32), महिलेचे पती सतिष बबन रजपूत (वय 42 दोघे रा.कोकणगाव,ता.श्रीगोंदा,जि. अहमदनगर) असे लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत जामखेड तालुक्यातील जावळा येथील 33 वर्षीय शासकीय कॉन्ट्रॅक्टरने अहमदनगर एसीबीकडे 10 जुलै रोजी तक्रार केली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी कारवाई करुन दोघांना लाच घेताना पकडले. तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचे 4 लाख 61 हजार 568 रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. तक्रारदार यांनी हे काम मुदतीत पूर्ण केले. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच व त्यांचे पती यांना विनंती केली.

त्यावेळी त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46 हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी अहमदनगर एसीबी कार्यालयात 10 जुलै रोजी तक्रार दिली. त्यानंतर पथकाने कोकणगाव ग्रामपंचायत येथे पडताळणी केली. त्यावेळी सरपंच उज्वला रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तक्रारदार यांचे बिल जमा झाल्यानंतर गुरुवारी सरपंच उज्वला रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांच्याकडे 46 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 40 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच सरपंच उज्वला राजपूत यांनी लाचेची रक्कम घेऊन कोकणगाव ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला. सरपंच महिलेला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवारयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,पोलीस अंमलदार रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, संध्या म्हस्के, राधा खेमनर, दशरथ लाड यांच्या पथकाने केली

हे पण वाचा

टीम झुंजार