साक्री :- शहरात रात्री साडेदहा-अकरा वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटून नेण्यासह तरुणीचे अपहरण केल्यामुळे घटनेला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा संशयितांना पकडले आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधले होते. ते हिंदीतून बोलत असल्याचे चोरी झालेल्या घरातील महिलेने पोलिसांना सांगितले.
निशा शेवाळे (वय २३) असे अपहरण झालेल्या तरुणीचे नाव आहे. शहरातील नवापूर रस्त्यावर विमलबाई महाविद्यालयाजवळ असलेल्या सरस्वती नगरात ‘दौलत’ नावाचा बंगला आहे. तिथे नीलेश पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही कामानिमित्त नीलेश हे संगमनेर येथे गेले होते. त्यांच्या पत्नी ज्योस्ना ह्या एकट्या घरी असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला घरी बोलावून घेतले होते. त्यामुळे घरी दोघी जणी होत्या. शनिवारी रात्री १०.३० ते ११ | वाजेदरम्यान गप्पा मारत होत्या. त्या वेळी घराचे दार ठोठावण्याचा आवाज झाला. पती असतील म्हणून महिलेने दार उघडले. इतक्यात तोंडाला मास्क बांधलेला इसम घरात शिरला.
त्याच्यापाठोपाठ हातात चाकू, बंदूकधारी चार-पाच जण आत आले. त्यांनी महिलेला मारहाण करत ओढत किचनमध्ये नेले. त्यातल्या एकाने हिंदीतून संभाषण करत ‘सोना कहा रखा है”” अशी विचारणा केली. ज्योत्स्ना पाटील यांचे दोघे हात आणि तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांनी इशाऱ्याने दागिने ठेवलेली जागा दाखवली. दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. एकूण ८८ हजार ५०० रुपयांचे दागिने घेऊन दरोडेखोर ज्योत्स्ना यांच्याजवळ आले. त्यांच्यासोबत असलेली निशा हिच्याकडे पाहून ‘इस लडकी को भी साथ लेके चलो’ असे सांगून दरोडेखोरांनी तिचे हात बांधून कारमधून सोबत नेले. अपहरण झालेल्या मुलीचे नाव निशा मोठाभाऊ शेवाळे आहे. ती ऑल इंडिया पोलिस जनसंघटनेचे कार्याध्यक्ष मोठाभाऊ शेवाळे यांनी कन्या आहे.
अपहरणामुळे घटनेला वेगळेच वळण…..
गुजरात व मध्य प्रदेशची सीमा धुळे जिल्ह्याला लागून आहे. जिल्ह्यात यापूर्वीदेखील दरोड्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शिवाय पोलिस दलाने देखील वेळोवेळी सखोल तपास करून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे; परंतु दरोड्यानंतर चक्क तरुणीचे अपहरण केल्याची पहिलीच घटना असावी, असे बोलले जात आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सहा संशयित ताब्यात, धागेदोरे मिळण्याची शक्यता…..
अपहरण झालेल्या तरुणीच्या मोबाइलवरील कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले. त्यात सर्वाधिक संभाषण झालेल्या सहा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरू असून, यातून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता बळावली आहे.
मध्य प्रदेश, गुजरातमध्ये शोध, पाच पथके नियुक्त……
गुन्ह्याची लवकर उकल व्हावी या उद्देशाने साक्री उपअधीक्षक यांचे दोन तर धुळे एलसीबीचे तीन अशी पाच पथक तयार केली आहेत. ही पथके धुळे जिल्ह्यासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यात पाठवण्यात आली आहेत. शिवाय रात्रीपासून जिल्ह्यात नाकाबंदीदेखील करण्यात आलेली आहे.
सखोल तपासावर भर, लवकरच होईल गुन्ह्याची उकल….
दरोड्यानंतर अपहरण केल्याची ही दुर्मीळ घटना आहे. पोलिस प्रशासन घटनेचा खोलात जाऊन तपास करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली आहे. लवकरच गुन्ह्याची उकल होईल. श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे,