नवी दिल्ली : नागरिकांच्या सुरक्षेसाठी, त्यांना न्याय मिळावा, यासाठी कायदे बनवले जातात; मात्र काही वेळा त्या कायद्यांचा गैरफायदा घेण्यासाठी नागरिकांकडून गैरकृत्यं केली जातात.दिल्लीमध्ये पॉक्सो कायद्याचा गैरफायदा घेण्यासाठी एका महिलेनं चक्क आपल्या 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा बनाव रचला. हे सत्य समोर आल्यावर मात्र न्यायालयाने त्या महिलेला कठोर शिक्षा दिली आहे. आई आणि मुलीमध्ये मायेचं नातं असतं. सगळ्या जगानं फसवलं, तरी आई मुलीला कधी फसवणार नाही, असा विश्वास या नात्यात असतो; मात्र काही स्त्रिया या नियमाला अपवाद ठरतात.
दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने स्वतःच्या मुलीचा फायद्यासाठी वापर करून हे सिद्ध केलंय. इतकंच नाही, तर तिने त्यासाठी न्यायालयाचाही वेळ वाया घालवला.आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार व्हावेत असं स्वप्नातही कोणत्या पालकांना वाटणार नाही; पण याच गोष्टीचा वापर करून एका स्त्रीने तिच्या 5 वर्षांच्या मुलीला न्यायालयासमोर उभं केलं. या महिलेनं आपल्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं खोटंच सांगितलं. या महिलेचा एक मालमत्तेवरून वाद सुरू होता आणि या वादाचा फायदा घेण्यासाठी तिने संबंधित व्यक्तीवर बलात्काराचे आरोप केले.
आपल्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. मुलगी 5 वर्षांची असल्यानं पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकरण कोर्टातही पोहोचलं; पण ती महिला साफ खोटं बोलत असल्याचं तपासात समोर आलं. पॉक्सो कायद्याचा गैरफायदा घेऊन दुसऱ्या पक्षावर दबाव आणण्याचा या महिलेचा उद्देश होता. न्यायाधीश सुशील बाला यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली, तेव्हा त्यांनी महिलेला कठोर शब्दांत सुनावलं व शिक्षाही दिली. न्यायाधीश म्हणाले, की ‘महिलेनं केवळ मालमत्तेच्या वादातून आरोपीची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला नाही, तर न्यायव्यवस्थेचीही खिल्ली उडवली. तसंच स्वतःच्या मुलीचीही फसवणूक केली.
या महिलेप्रमाणेच अनेक जण स्वतःच्या फायद्यासाठी पॉक्सो कायद्याचा वापर करतात. कधी परस्पर भांडणांमुळे, तर कधी मालमत्तेच्या वादातून, तर कधी अन्य कारणांनी बलात्काराचे खोटे आरोप केले जातात, जेणेकरून खोट्या खटल्यात आरोपी दीर्घ काळ तुरुंगात जाऊ शकतो. न्यायालयाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.’न्यायालयाने त्या महिलेला या प्रकरणात शिक्षा म्हणून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक महिन्याच्या आत ही रक्कम त्या महिलेला जमा करावी लागणार आहे. तसं न केल्यास तिला 3 महिने तुरुंगात राहावं लागेल. न्यायालयाच्या या निकालामुळे कायद्याचा चुकीचा वापर करणाऱ्यांना धडा मिळू शकतो.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५