वर्धा :- येथील रहिवासी एका शिक्षिका महिलेने आपल्या सहा वर्षीय मुलासह जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घक्कादायक घटना शुक्रवारी घडली. पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. अश्विनी नीलेश आष्टाणकर (३३) आणि शिवांश (६) अशी आत्महत्या केलेल्या आई व मुलाचे नाव आहे.वर्धा येथील रामनगर पोलीस ठाण्यात अश्विनी आष्टाणकर मुलासह बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.

नातेवाईकांनी दोघांचाही शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाही. दरम्यान, ते दोघेही आज सकाळी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या कुरणखेडला पोहोचले. काटेपूर्णा देवीचे दर्शन दोघांनी घेतले. त्यानंतरच मंदिराच्या परिसरात असलेल्या काटेपूर्णा नदीत अश्विनी आष्टाणकर यांनी आपल्या चिमुकल्या शिवांशला मिठीत घेऊन नदीत उडी घेतली. दोघांचे मृतदेह दिसताच परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात माहिती बोरगाव मंजू पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना एक पर्स घटनास्थळी आढळून आली.
त्यामध्ये दोघांची ओळखपत्रे होती. त्यातून मृतांची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी देखील आढळून आली. वर्धा येथील अश्विनी यांचे लग्न नागपूरच्या नीलेश आष्टाणकरसोबत झाले होते. दोघांमध्ये वाद होत असल्याने अश्विनी यांनी नीलेशला घटस्फोट दिला. त्या वर्धेमध्ये माहेरी राहत होत्या. घटस्फोटानंतरही पतीकडून त्रास दिला जात असल्याने त्याला कंटाळून मुलासह आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.