CCTV VIDEO: पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्यामुळे गमवावा लागला जीव पहा व्हिडिओ.

Spread the love

CCTV VIDEO:लखनौ (उत्तर प्रदेश): अलिगढ येथे पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्याकडून चुकून गोळी लागली आणि इशरत जहाँ या महिलेला जीव गमवावा लागला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.अलिगढच्या ऊपरकोट पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेली महिला कार्यालयात पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी संबंधित कर्मचाऱ्याची वाट पाहत होती. त्यावेळी, पोलिस ठाण्यातील अधिकारी हातात बंदुक घेऊन, लोड करुन चेक करत होते.

त्याचवेळी, त्यांनी ट्रिगर दाबल्याने बंदुकीतून सुटलेली गोळी थेट महिलेला लागली, त्यामुळे महिला जागीच कोसळली. पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी महिलेच्या डोक्याला लागली. त्याचवेळी, शेजारी उभा असलेल्या महिलेच्या मुलालाही काय करावे कळेनासे झाले. त्याने तात्काळ आईला उचलून धरले. त्यानंतर, जवळील जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. दुसरीकडे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली असून त्यास निलंबित करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी रात्री बाजार बंद केला होता. तसेच, मेडिकल कॉलेजच्याबाहेरही आंदोलन केले.

इशरत जहाँ पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी मुलगा ईशानसोबत ऊपरकोट पोलिस ठाण्यात गेली होती. संबंधित कर्मचाऱ्याच्या खुर्चीजवळ ही महिला उभी होती. त्याचवेळी, पोलिस अधिकारी मनोज कुमार यांना शिपायाने शस्त्रागारमधून बंदुक दिली. मात्र, मनोज कुमार यांनी कुठलीही काळजी न घेता बंदुक लोड करुन ट्रिगर दाबला. त्यामुळे, बंदुकीतून सुटलेली गोळी समोरच उभ्या असलेल्या नुसरत जहाँ यांच्या डोक्यावर लागली. हे पाहून नुसरत यांचा मुलगा भयभीत झाला. मात्र, पोलिस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जहाँ यांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, कायद्यान्वये पोलिस अधिकारी मनोज कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे एसएसपी कलानिधी नेथानी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

टीम झुंजार