एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ३८ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल पासून किलोमीटर अंतरावर असलेल्या खडके बुद्रुक गावाजवळ झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अरुण काळू मराठे असे मृत इसमाचे नाव आहे.
धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथील अनिल रघुनाथ पाटील हे त्यांचे मित्र अरुण काळू मराठे यांच्यासह दुचाकी क्र. एमएच १८ बीडब्ल्यू १८३६ ने अरुण मराठे यांच्या नातेवाईकांकडे विवाहासाठी जळगाव येथे आले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम आटोपून हे दोघ अनिल पाटील यांची सासरवाडी असलेल्या भडगाव तालुक्यातील बलवाडी येथे जात होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडके येथील वळणावर भडगावकडून येणारा ट्रक क्रमांक एमएच १८ बीजी ३२४० ने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारल्याने अरुण मराठे हे गाडी खाली पडले.
त्याच वेळेस ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे बघून अनिल पाटील यांनी आरडाओरड केल्यामुळे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. अरुण मराठे यांना खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात आणले डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी यांनी तपासले असता मयत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान अपघातात अनिल पाटील हे देखील जखमी झाल्यामुळे त्यांचेवर उपचार सुरू आहेत. याबाबत अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक विकास देशमुख तपास करीत आहेत. मयत अरुण मराठे यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ते धुळे येथे क्रेशर मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करून ते आपल्या परिवाराचा उदार निर्वाह भागवत होते.