तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीने लग्नादिवशीच हळदीनंतर गळफास घेऊन संपविले जीवन.

Spread the love

एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक शेवट, तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

सोलापूर : तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीने लग्नादिवशीच हळदीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. १७) मध्यरात्रीनंतर हत्तुरे वस्तीतील ओम नमः शिवाय नगरात ही घटना घडली. सालियॉ महिबूब शेख (रा. ओम नमः शिवाय नगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.याप्रकरणी त्या तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. समीर चाँदसाब शेख, सलमान पीरसाब शेख, वसीम सैपन शेख (सर्व रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी सालियॉ हिचे वडील महिबूब शेख (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे.ठेकेदार असलेल्या महिबूब यांची कन्या सालियॉ हिला २०१९ मध्ये संशयित आरोपी समीर याने लग्नासाठी मागणी घातली होती.मात्र, सालियॉने नकार दिला होता. त्यानंतर तो सतत तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा.सलमान याच्यामार्फत खाण्याचे पदार्थ पाठवून शारीरिक, मानसिक त्रास द्यायचा. सालियॉचा कर्नाटकातील गौसपाक सांगलीकर (रा. विजयपूर) याच्याशी विवाह ठरला होता. त्यानुसार सोमवारी (ता. १८) आसरा चौक परिसरातील रॉयल प्लाम हॉलमध्ये विवाह होणार होता.

संशयित आरोपींनी रविवारी रात्री सालियॉ हिचे समीर याच्यासोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ तिचा होणारा पती गौसपाक याच्या व्हॉट्सॲपवर पाठविले. त्यामुळे त्याने लग्नास नकार दिल्याने रात्री तीननंतर सालियॉ हिने राहत्या घरी झोपण्याच्या खोलीत छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे तपास करीत आहेत.

पोलिसांत दिली होती तक्रार

शुक्रवारी सालियॉ हिने विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. समीर व सलमान हे माझ्या होणाऱ्या पतीला माझे समीरसोबत संबंध आहेत, तू सालियॉशी लग्न केल्यास तुला जिवंत सोडणार नाही, तू सोलापुरात येऊन लग्न कसे करतो पाहू, अशी धमकी देत आहेत. तीन दिवसांपासून ९१६८०२०२५९, ८२०८२७७०८२ या मोबाईल क्रमांकांवरुन मेसेज करून ब्लॅकमेल करीत आहेत. गुंडगिरीची भाषा बोलत आहेत. यामुळे माझ्या परिवाराची बदनामी होत आहे. माझे लग्न न झाल्यास मी आत्महत्या करेन. त्याला हे दोघे जबाबदार असतील. तसेच माझ्या वडिलांनी मेसेजबाबत विचारणा केल्यावर मला पोलिसांची भीती दाखवू नको, कोठे तक्रार करायची आहे कर, अशी दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संशयित समीर शेख विवाहित, पत्नीला तलाक

संशयित समीर शेख हा विवाहित आहे. त्याने पत्नीला तलाक दिला आहे. त्याने सालियॉ हिला मागणी घातली होती. त्यातूनच तो दोघा मित्रांच्या मदतीने सतत तिला त्रास देत होता. तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ डिलीट करायला लावले होते, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.शेख कुटुंबीय शुक्रवारी तोंडी तक्रार करीत होते. आम्ही त्यांच्याकडून लेखी तक्रार घेतली आहे. त्यांनी तक्रार दिलेल्या दोघांविरुद्ध कलम १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संशयितांचा शोध सुरू आहे. त्यासाठी पथके नेमली आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार