मानसिक विकृतीमुळे निर्दयी बापानं निष्पाप, निरागस एकुलत्या एक पोराचा गळा आवळून केला खून; कारण ऐकूण आईसह गावकरीही झाले सुन्न

Spread the love

कोरेगाव :- वडिलांच्या मानसिक विकृतीमुळे विक्रम बळी गेला. या घटनेने विक्रमची आई आणि हिवरे गावातील ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.वाठार स्टेशन : हिवरे (ता. कोरेगाव) येथील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विक्रम ऊर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) या निष्पाप, निरागस एकुलत्या एक मुलाचा वडिलांनीच गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. घटना घडल्यापासून दोन दिवस पोलिसांनी गतिमान तपास करत शेवटी सोमवारी रात्री वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी वाठार पोलिसांनी विजय खताळ यास अटक केली आहे. दरम्यान, विजयने स्वत:च्या आजाराविषयीच्या अज्ञानातून मुलाचा घात केल्याने परिसर सुन्न झाला आहे. विक्रम ऊर्फ प्रणव खताळ याचा शनिवारी (ता. १२) गळा आवळून खून झाल्याची फिर्याद विक्रमचे वडील विजय खताळ याने वाठार पोलिस ठाण्यात दिली.

खुनाच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी खोटी फिर्याद दिली असली तरी पोलिसांच्या गतिमान तपासामध्ये अखेर विजय खताळ याने स्वत: खून केल्याची पोलिसांना कबुली दिली. विजयने गेल्या १५ दिवसांपूर्वी स्वतःचे वजन केले असता २० किलोने वजन कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून त्याने आपल्याला कोणता तरी कॅन्सरसारखा आजार झाल्याचा भ्रम करून घेतला. आता आपण लवकर मरणार आणि आपल्या मागे मुलाचे जगणे कठीण आहे. लोकांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार, या टोकाच्या नकारात्मकेतून मुलाला संपवण्याचा विकृत विचार विजय खताळ यांच्या डोक्यात भिणू लागला. त्यानुसार त्याने शनिवारी घरापासून काही अंतरावर असलेल्या जनावरांच्या गोठ्यातून गायीच्या एका बाजूला बांधलेली दोरी सोडून खिशात घातली आणि गायीला साडीच्या धडप्याने बांधले.

घरी येऊन बायको व मुलाला कुंभारकी नावाच्या शिवारातील शेतात जनावरांना चारा काढण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. ते तिघे शेतात गेले असता त्या शेतापासून पुढे काही अंतरावर विजय याची पत्नी जळण काढण्यासाठी गेली व विजय व त्याचा मुलगा विक्रम हे उसामध्ये जनावरांसाठी वाड्याचे कोंब काढण्यासाठी तोडणीस आलेल्या उसाच्या शेतामध्ये गेले. यावेळी विजय हा मुलाला सांगत होता, ‘आपण गरीब असल्याने आपल्याला लोक भरपूर त्रास देणार, तुला कोण काही बोलल्यास त्यांना न घाबरता..’ हे संभाषण चालू असताना विजयने खिशातून दोरी काढत विक्रमच्या गळ्यात टाकली व अशी दोरी टाकून ओढायची, असे म्हणत वडिलांनी विक्रमचा गळा आवळला. सुमारे १० मिनिटांनी विक्रम निपचित पडल्यानंतर त्याला उसाच्या सरीत झोपवून त्याचा मृतदेह पाचटीने झाकला.

त्यानंतर उसाचे कोंब काढून ते शेजारच्या शेतात टाकले व दुपारी चार वाजता गावच्या दिशेने जात असताना त्याच्या पत्नीचा अजून का घरी आला नाहीत? असे विचारण्यासाठी फोन आला. यावेळी विक्रमची चप्पल रानात विसरली आहे, तो चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात गेला आहे, असे सांगून तो स्वतः पुन्हा शेतात गेला व उसाच्या शेतात असलेली मृत विक्रमची चप्पल शेताच्या बांधावर टाकली व गावाजवळ असलेल्या गोठ्यात जाऊन गुन्ह्यात वापरलेली दोरी गायीला पुन्हा बांधून ठेवली. खुनाचे स्वरूप पाहून व दोन दिवसांच्या तपासामध्ये पोलिसांचा पहिल्यापासूनच मुलाच्या वडिलांवर संशय होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलिसांनी विकृतीतून घडलेल्या आणि बापानेच निष्पाप मुलाचा खून केल्याचा पर्दाफाश केला.

आज संशयित आरोपीस कोरेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली. कारवाईमध्ये जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सुधीर पाटील, रवींद्र मोरे, वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर, तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, शरद बेबले, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने.

तसेच प्रवीण फडतरे, राकेश खंडके, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, शिवाजी भिसे, स्वप्नील कुंभार, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, अमृत कर्पे, विजय निकम, संभाजी साळुंखे, अमित झेंडे, अजय जाधव, नितीन भोसले, उदय जाधव, प्रशांत गोरे, प्रतीक देशमुख यांनी सहभाग घेतला होता.

विकृतीने घेतला बळी..

वडिलांच्या मानसिक विकृतीमुळे विक्रम बळी गेला. या घटनेने विक्रमची आई आणि हिवरे गावातील ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. विक्रमचा काय दोष होता, या प्रसंगाने नातेवाईक, ग्रामस्थ गहिवरून गेले आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार