नागौर: तिहेरी हत्याकांडाने राजस्थानातील नागौरमध्ये खळबळ उडाली आहे. पडुकलान इथं राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने रविवारी कुऱ्हाडीने वार करून आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली. मोहित असं आरोपीचं नाव असून त्याला मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं, असं सागितलं जात आहे. मोहित दिवसातील तब्बल १५ ते १६ तास मोबाईलचा वापर करत असे. एखाद्या हिंसक ऑनलाइन गेमच्या व्यसनातूनच मोहितने हे कृत्य केलं आहे का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.
कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केल्यानंतरही मोहितच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची भावनाही नव्हती. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी मोहितला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीत मोहितने एक महिन्यापूर्वीच हत्येचा कट रचल्याचं उघड झालं आहे. मात्र त्याने जन्मदात्या आई-वडिलांसह बहिणीची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
नेमकं काय घडलं?
रविवारी मोहितने आधी आपल्या आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह घरासमोर असणाऱ्या अंगणात आणून टाकले. त्यानंतर त्याच्या वडिलांना जाग आल्याने ते आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यानंतर मोहितने त्यांच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात मोहितचे वडीलही जागेवरच कोसळले आणि काही क्षणांत त्यांनी आपले प्राण सोडले. दरम्यान, तीनही मृतदेह अंगणात ठेवून मोहित तिथंच बसून होता. या घटनेनं नागौरमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.