सांगली : बामणोली (ता. मिरज) येथील एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या मिरजेतील युवक व युवतीने एकापाठोपाठ आत्महत्या केली. साक्षी रवींद्र जाधव (वय १६, रा. विद्यासागर काॅलनी, एस.टी. वर्कशाॅपजवळ, मिरज) या युवतीने मंगळवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यानंतर बुधवारी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या प्रथमेश हणमंत पाटील (वय १७, मूळ गाव इरळी, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. सुभाषनगर, मिरज) याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
दोन्ही आत्महत्यांचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, एकापाठोपाठ झालेल्या या दाेन्ही घटनांचा पोलिस तपास करीत आहेत. एकाच महाविद्यालयातील दोघांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृत साक्षी जाधव हिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष हाेत हाेते. याबाबत शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी तिचे आई-वडील मंगळवारी सायंकाळी महाविद्यालयात आले होते. आई-वडिलांना महाविद्यालयात पाहून घाबरलेल्या साक्षीने दप्तर बसमध्ये ठेवून महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली.
काेणाला काही कळण्यापूर्वी ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. डोक्याला व कमरेला मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेचा तपास सुरू असताना याच महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथमेश पाटील याने मिरजेतील सुभाषनगर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश पाटील हा मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावचा आहे. त्याच्या शिक्षणासाठी पाटील कुटुंबीय सुभाषनगर येथे भाड्याच्या घरात राहतात.
प्रथमेशचे वडील हणमंत पाटील हे जम्मू येथे सैन्यदलात असून, आई वैशाली पाटील, लहान भाऊ हर्षद पाटील यांच्यासह प्रथमेश सुभाषनगर येथे राहत होता.मंगळवारी महाविद्यालयातून आल्यानंतर प्रथमेश हा आई व भावासाेबत जेवण करून झोपी गेला. कुटुंबीय नेहमीप्रमाणे पहाटे त्याला उठविण्यास गेले. परंतु तो उठत नसल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. खोलीत प्रथमेश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दोघांनी आपली जीवनयात्रा का संपविली, याचे नेमके कारण समजू शकले नाही. कुपवाड एमआयडीसी आणि मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






