श्रीक्षेत्र रामेश्वर दुर्घटनेतील तीनही युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत,आ. चिमणरावजी पाटील यांचा पाठपुरावा.

Spread the love

एरंडोल :- श्रीक्षेत्र रामेश्वर येथील नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेल्या तीनही युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत मंजूर झाली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.तीनही युवकांच्या वारसांना लवकरच मदतीचे धनादेश देण्यात येणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.एरंडोल येथून सुमारे दोनशे ते तीनशे भाविकांनी २१ ऑगस्ट रोजी एरंडोल ते श्रीक्षेत्र रामेश्वर धामपर्यंत श्रावण महिन्यानिमित्त पायी कावड यात्रा काढली होती.सर्व भाविक श्रीक्षेत्र रामेश्वर येथे सायंकाळी पोहोचले.

श्रीक्षेत्र रामेश्वर येथील नदीच्या संगमावर कावड यात्रेत सहभागी झालेले भगवा चौक परिसरातील अक्षय प्रविण शिंपी,सागर अनिल शिंपी,पियुष रवींद्र शिंपी या एकाच परिवारातील तीनही युवकांचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला होता.नदीपात्रात बुडून पावलेले तीनही युवक सख्खे चुलत भाऊ असल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर पसरला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार चिमणराव पाटील यांचेसह विविधपक्षाच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी भेट देवून बचाव कार्याची माहिती घेतली होती.

नदीत बुडून तीन युवकांचा मृत्यू झाल्याचे समजताच शहरातील मेनरोड वरील व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळून युवकांना श्रद्धांजली वाहिली.पालकमंत्री गुलाबराव पाटील,माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, माजीमंत्री डॉ.सतीश पाटील,शिक्षक आमदार सुधीर तांबे यांचेसह विविध पक्षाच्या पदाधिका-यांनी शिंपी परिवाराची भेट घेवून सांत्वन केले होते.तीनही युवकांवर २२ ऑगस्ट रोजी शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.एकाच परिवारातील तीन युवकांची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाल्यामुळे शहरातील नागरिक देखील शोकसागरात बुडाले होते.

अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी त्वरित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संपर्क साधून झालेल्या दुर्घटनेची माहिती दिली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पिडीत परिवारातील सदस्यांशी संपर्क साधून दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. मयत युवकांच्या वारसांना शासनाच्यावतीने पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी अंत्यसंस्कार प्रसंगी सागितले होते.आमदार चिमणराव पाटील यांनी याबाबत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झाल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले असून लवकरच धनादेश देण्यात येणार आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार