धक्कादायक! डॉ साहेब या सापाने मला चावा घेतला आहे; संर्पदंशानंतर चिमुकला सापाला घेऊन पोहचला रुग्णालयात

Spread the love

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सापाने एका चिमुकल्याला दंश केला. ही घटना त्याच्या काकाच्या लक्षात येताच हा मुलगा आणि त्याचे काका या सापाला घेऊन थेट रुग्णालयात पोहोचले.अमान शेख रशीद वय १४ वर्ष (वर्ग आठवी) रा.अजिंठा सराय असं या मुलाचं नाव आहे. हा मुलगा साप घेऊन रुग्णालयात पोहोचला. तिथे जाताच डॉक्टरांना म्हटला की,’ साहेब या सापाने मला चावा घेतला आहे, तो विषारी आहे की, बिनविषारी ते बघा आणि माझ्यावर उपचार करा’ मुलाचं हे बोलणं ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना अजिंठा गावातील खारी बारव येथे घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा गावात निजाम कालीन बारवेची दुरवस्था झाली आहे. नागरिक त्यात कचरा टाकत असल्यामुळे ती कचरा कुंडी बनली आहे. या बारवेमधून अनेकदा साप निघतात. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या बारव परिसरात एका सापाने अमानला चावा घेतला. या मुलाच्या काकांना त्याला साप चावा घेत असल्याचं दिसलं.

त्यानंतर काका शेख चांद शेख जलील यांनी लगेच त्या सापाला पकडलं, आणि ते मुलाला आणि सापाला घेऊन अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. तिथे असलेले डॉक्टरही त्या सापाला पाहून घाबरले. त्यांनी या सापाला डब्यात टाकायला सांगितले. त्यानंतर या रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सध्या या चिमुकल्यावर छत्रपती संभाजी नगर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासादरम्यान हा चिमुकला सापाला न घाबरता चक्क आपल्या उशाला घेऊन झोपला.

हे पण वाचा

टीम झुंजार