एक वर्षापासून शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सोडले शिक्षण; पिडीतेने मागितली राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद अन्…….

Spread the love

पुणे : सोसायटीत लिफ्टवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने मुलीसह तिच्या आईला त्रास आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. वारंवार शेजारच्या व्यक्तीकडून त्रास होत असल्याने मुलीने आधी शिक्षण सोडले. मात्र त्या व्यक्तीने त्रास देणे सुरुच ठेवले. त्यामुळे वर्षभर त्रास सहन केल्यावर पीडित मुलीने या प्रकरणी थेट राष्ट्रीय महिला आयोगाला (NCW) पत्र लिहून दाद मागितली. या प्रकरणी आता सहकार नगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील धनकवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई सोबत धनकवडी येथील एका सोसीटीत राहते. या सोसायटीत असणाऱ्या लिफ्टवरून इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या व्यक्तीचे आणि पीडित मुलीच्या आईचा जानेवारी 2023 मध्ये मोठा वाद झाला होता. यानंतर आरोपी व्यक्तीने पीडित मुलीच्या आईला मारहाण केली. याप्रकरणी पीडित मुलीने आणि तिच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आरोपी व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही.

याउलट आरोपी व्यक्तीने पीडित मुलीला आणखीणच त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीची आई कामानिमित्त बाहेर असायची, त्यामुळे आरोपी व्यक्ती या गोष्टीचा गैरफायदा घेत होता. पीडित मुलगी घरातून ये-जा करत असताना आरोपी तिला पाहून अश्लील इशारे करायचा. पीडित तरुणी जिन्याचा वापर करून इमारतीच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तो तिची वाट अडवायचा, हात पकडण्याचा प्रयत्न करायचा, फोन नंबर मागायचा आणि पाठलाग देखील करायचा. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने एक दिवस आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र तुझ्या आईला आणि तुला बघून घेईन. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. माझ्यावर गुन्हा नोंदवून माझे काही झाले नाही, अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली.

राष्ट्रीय महिला आयोगाने पीडित मुलीच्या पत्राची घेतली दखल

आरोपींच्या धमक्या आणि गैरवर्तनामुळे पीडित मुलगी कंटाळली होती. तिने भीती पोटी शाळेत जाणे बंद केले, घराबाहेर पडणे बंद केले. आईच्या काळजी पोटी तिने आरोपीचा त्रास वर्षभर सहन केला. मात्र या सर्व गोष्टींचा पीडित मुलीच्या तब्येतीवर झाला. तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली. त्यामुळे तिने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. पोलिसांकडे याआधी तक्रार करून आरोपीवर कोणतीही तक्रार न झाल्याने पीडित मुलीने थेट राष्ट्रीय महिला आयोगाला याबाबत पत्र लिहत वर्षभर होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. राष्ट्रीय महिला आयोगाने पीडित मुलीच्या पत्राची दखल घेत याप्रकरणी सहकार नगर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानतंर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती सहकार नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे यांनी दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार