नालीत साचलेल्या पाण्याच्या साफसफाई वरून दोन कुटुंबात वाद, भाच्यांनी केलेल्या मारहाणीत मामाचा मृत्यू; चाळीसगाव तालुक्यातील घटना.

Spread the love

चाळीसगाव :- तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रमांक १ येथे नालीत साचलेल्या पाण्याच्या साफसफाईवरून दोन कुटुंबात वाद होऊन जबर हाणामारीची घटना घडली. भाच्यांनी केलेल्या या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले, की सुंदरगनर तांडा क्रमांक १ येथे रविवारी (ता. ७) सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी खंडू पंडित मोरे (वय २९) याच्या घरासमोरील पाण्याच्या नालीची खंडू याच्या आईने साफसफाई केल्यावरून खंडूच्या आत्याच्या मुलांनी वाद घातला होता.

त्यावेळी खंडू मोरे हा बहिणीसह केडगाव येथे गेलेला होता. तेथून बहिणीसोबत घरी सुंदरनगरला आल्यानंतर त्यांना या वादाची घटना समजली. त्यावर खंडूच्या बहिणीने शिवीगाळ का केली? अशी विचारणा आत्याच्या मुलांना केली. त्यावर आत्याच्या मुलांनी पुन्हा त्यांनाच धमकी देऊन पुन्हा शिवीगाळ केली होती. सोमवारी (ता. ८) सकाळी नऊच्या सुमारास खंडू मोरे घराबाहेर उभा असताना त्याच्या आत्याची मुले अचानक आले त्यांनी खंडूला मारायला सुरवात केली.

त्याला वाचविण्यासाठी खंडुची बहीण व आई- वडील आले असता, आत्याच्या मुलाने बहिणीसह लाकडी दांडा मामा पंडित मोरे (वय ५८) यांना मारला. बहिणीवर चाकूसारख्या हत्याराने वार केले. या मारहाणीत जबर जखमी झालेल्यांनी मेहुणबारे पोलिस ठाणे गाठले. तेथून सर्वजण चाळीसगावला रूग्णालयात दाखल झाले. या मारहाणीत जखमी झालेल्या पंडित भारमल मोरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ दुसऱ्या खासगी रूग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत खंडू मोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक भावसिंग माळी.अशोक भावसिंग माळी, लक्ष्मीबाई दीपक माळी, सीमा किसन बागूल, श्रीकांत माळी, प्रल्हाद (पूर्ण नावाची नोंद नाही), आदित्य माळी, दीपकचा गावी आलेला भाचा (पूर्ण नावाची नोंद नाही) अशा आठ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आठही संशयितांना ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

हे पण वाचा

टीम झुंजार