एरंडोल :- राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कासोदा नाक्याजवळ वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिका-यांनी रास्तारोको आंदोलन करून महामार्गावर त्वरित उपाय करण्यात यावे अशी मागणी केली.याबाबत आठ दिवसात कारवाई न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी पदाधिका-यांनी दिला.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कासोदा नाका परिसरात अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
बुधवार (ता.१०) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्यामुळे शहरातील संतप्त नागरिकांनी सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता.रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.काल सकाळी शिवसेना ठाकरे गटातर्फे अपघातस्थळी परिसरात पुन्हा आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी केले.

आठ दिवसाच्या आत अपघातस्थळ परिसरात गतिरोधक बसवण्यात यावेत,समांतर रस्त्यांचे कामे लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुढील काळात कासोदा नाका परिसरात अंडरपास
करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.याबाबत त्वरित दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा
पदाधिका-यांनी दिला.आंदोलनस्थळी संबंधित अधिका-यांनी भेट देवून मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,किशोर निंबाळकर,जिल्हापरिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, सुनील चौधरी,सुभाष मराठे,शहरप्रमुख प्रमोद महाजन, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाब पाटील,शहरप्रमुख जयेश महाजन, शहर समन्वयक परेश बिर्ला,प्रसाद दंडवते, सुनील मराठे, नितीन महाजन,राजा भेलासेकर,अरुण महाजन, चंदू जोहरी,राजेश महाजन,अमोल भावसार,पिंटू भोळे, गजानन महाजन,अतुल मराठे, रवींद्र चौधरी,भुरा महाजन,गोपाल महाजन,किरण महाजन,राहुल महाजन,
भरत महाजन,प्रसाद महाजन,किशोर पाटील,कमलेश सोमाणी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनामुळे
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील नंदनवाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल यांनी पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवला.आंदोलन शांततेत पार पडले.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






