प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिर सज्ज; मंदिरातील व सजावटीचे मनमोहक, आकर्षक फोटो खास आपल्यासाठी पहा Photo

Spread the love

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघा थोडाच कालावधी उरला आहे.श्री राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे.ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्राण प्रतिष्ठा’ विधी पार पडणार आहे. अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे या सोहळ्यानिमित्त सुरु असलेल्या तयारीचे काही खास फोटो पाहू…

संपूर्ण देश या सोहळयाची प्रतिक्षा करत आहे. राम मंदिरात उद्याच्या सोहळ्याची लगबग सुरू आहे.राम मंदिराला अभिषेक सोहळ्यापूर्वी रंगीबेरंगी फुलांनी सजवले जात आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिराला आकर्षक सजावट केली असून फुलांनी मंदिराला व्यापून टाकले आहे. याचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत.तसेच संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही उपस्थिती असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्राण प्रतिष्ठा’ विधी पार पडणार आहेत. ते येथे चार तास थांबतील.

प्राणप्रतिष्ठेचा दिवस आता एका दिवसावर येऊन ठेपला असताना संपूर्ण भारतात एका सणाप्रमाणे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या राम मंदिरात वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाईल.

प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात, त्यानंतर मूर्तीला देवत्त्व प्राप्त होतं. सोहळा किती सर्वसमावेशक आहे यावर ही प्रक्रिया किती मोठी असणार हे ठरते.

अयोध्येतील राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं गेलं आहे. मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.

राम मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल.

मंदिरात ५ मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असणार आहेत. खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती असणार आहेत.

मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही असणार आहेत.

मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित्व राहील.

मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूण ७० एकर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र कायम हिरवेगार राहील.

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील विविध काम पूर्ण करण्यासाठी कामगारांची धावपळ सुरु आहे.

याशिवाय राममंदिराच्या आतील सजावटीसह बाहेरूनही आकर्षक फुलांची आणि लखलखत्या दिव्यांची सजावट केली जात आहे.

अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. सुरक्षेसाठी २० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

टीम झुंजार