एरंडोल :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अद्यापपर्यंत भूमिका जाहीर केली नसल्यामुळे पदाधिकारी व
कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.प्रा मनोज पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले असून आगामी काळात त्यांच्या माध्यमातून मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. प्रा.मनोज पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी दहा वर्ष काम पाहिले असून त्यांच्या आई सरलाताई पाटील देखील माजी नगरसेविका आहेत.२०१६ मध्ये झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रा.मनोज पाटील यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला असला तरी पालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक होती.सुमारे तीन वर्षांपासून प्रा.मनोज पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर त्यांनी अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. प्रा.मनोज पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटात राहतात की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात राहतात का अन्य पर्याय निवडून राजकीय भूकंप घडवतात याकडे पदाधिका-यांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.प्रा.मनोज पाटील यांचेशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटातील वरिष्ठ पदाधिका-यांनी संपर्क साधल्यानंतर देखील त्यांनी अद्यापपर्यंत भूमिका जाहीर केलेली नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून त्यांना विधानसभा निवडणुक उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.तीन ते चार वर्षांपासून प्रा.मनोज पाटील यांचा शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचेसोबत संपर्क वाढला असून आमदार पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी यापूर्वी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शहरातील आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढला आहे.तसेच भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर यांच्यामुळेच नगरपालिकेत प्रा.मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी पाच वर्ष भाजपला साथ दिल्यामुळे ते भाजप अथवा शिवसेना (शिंदे गट) यापैकी एका पक्षाचा पर्याय निवडून राजकीय भूकंप करतील असे सर्वत्र बोलले जात आहे.शहरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच राष्ट्रीय पुरुषांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त भाजपच्या एका पदाधिका-याच्यावतीने लावण्यात येणा-या फलकावर आमदार चिमणराव पाटील,भाजपचे advt.किशोर काळकर यांचेसह प्रा.मनोज पाटील यांचे छायाचित्र लावण्यात येत असल्यामुळे त्यांचा कल या दोन्ही पक्षांकडे असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या प्रा.मनोज पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आच्छर्य व्यक्त केले जात आहे.प्रा.मनोज पाटील छत्रपती क्रीडा प्रसारक मंडळ व व्यायामशाळा या संस्थेचे प्रमुख असून
संस्थेशी शहरासह ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत.प्रा,मनोज पाटील यांनी क्रीडा प्रसारक मंडळ आणि व्यायामशाळेच्या माध्यमातून शहरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून युवकांचे मजबूत संघटन उभे केले आहे.प्रा.पाटील स्वत: प्रसिद्ध पहेलवान असल्यामुळे नवोदित मल्लांना ते व्यायाम आणि कुस्ती संदर्भात नेहमीच मार्गदर्शन करीत
आहेत.प्रा.मनोज पाटील यांनी पालिकेची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत नियोजन करीत आहेत.