एरंडोलला 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर विशेष बाब म्हणून मंजूर.-आमदार चिमणराव पाटील.

Spread the love

एरंडोल :- शासनाने एरंडोल येथे वीस खाटांच्या ट्रामा केअर सेंटरला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.एरंडोल येथे ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ट्रामा केअर सेंटर मंजुरीसाठी प्रयत्न केल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. एरंडोल शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जात असल्यामुळे रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वाहतूक सुरू असते.धरणगाव, भडगाव, धुळे आणि जळगाव याठिकाणी जाणा-या वाहनांची या रस्त्यावर कायम वर्दळ सुरु असते.

राष्ट्रीय महामार्गावरून जाणा-या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकवेळा रस्ते अपघात होत असतात. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर ग्रामीण रुग्णालयात अथवा खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याना पुढील उपचारासाठी जळगाव येथे न्यावे लागत असल्यामुळे प्रवासात वेळ वाया जात असतो. जखमींवर तातडीने आवश्यक उपचार न झाल्यास अथवा उपचार करण्यास वेळ गेल्यास जखमी व्यक्तीचा मृत्यू होण्याची भीती असते.खासगी रुग्णालयात जखमी व्यक्तींना दाखल केल्यास त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक फटका बसत असतो. अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी शहरात ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.

आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर व्हावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.शासनाच्या आरोग्य विभागाने शहरासाठी वीस खाटांच्या ट्रामा सेंटरला विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ट्रामा केअर सेंटरमुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांवर चांगल्या प्रकारचे उपचार करता येणार आहे.मतदार संघातील रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधांसह आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

ट्रामा केअर सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे त्याचे काम सुरु करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघात शिक्षण,आरोग्य, दळणवळण यासह मतदारांना आवश्यक असणा-या सर्वप्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात देखील शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.दरम्यान शहरासाठी अनेक दिवसांपासून ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याच्या मागणीस शासनाने मंजुरी दिल्यामुळे मतदारसंघात विशेषत: वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार