मुंबई :- रेल्वे विभागात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून एका महिलेने नवी मुंबईत राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाकडून दहा लाख रुपये उकळल्याचा प्रकार झाला आहे. या महिलेने सदर तरुणाला रेल्वेचे बनावट नियुक्ती पत्र तसेच ओळखपत्र देऊन एक महिना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर काम सुद्धा करून घेतले आहे.याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.जुईनगर येथे राहणारा अमेय घाग (२७) यांची उल्हासनगर येथे राहणारी पिंकी उर्फ प्रियंका जाधव या महिलेने फसवणूक केली आहे. जुलै २०२२ मध्ये भावाच्या मैत्रिणीने प्रियंका जाधव बाबत अमेयला माहिती दिली होती.
प्रियंकाने रेल्वे विभागात चांगली ओळख असल्याचे सांगत अनेकांना रेल्वेत नोकरीला लावल्याचे सांगितले होते. तसेच अमेयला देखील रेल्वे विभागात लिपिकाची नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत दहा लाखांची मागणी केली होती. यावेळी अमेयने कागदपत्रांसह ४ लाख ९० हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये प्रियंकाने अमेयच्या व्हॉट्सॲपवर बनावट नियुक्ती पत्र पाठवले होते. त्यामुळे अमेयने उर्वरित ४ लाख ८५ हजार रुपये तिच्या खात्यावर पाठवून दिले होते. यावेळी अमेयची सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कमर्शिअल क्लार्क म्हणून नियुक्ती झाल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सही शिक्का असलेले रेल्वे विभागाचे बनावट ओळखपत्र देखील दिले होते. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रियंका जाधवच्या सांगण्यावरून अमेयने सीएसएमटी, ठाणे, कुर्ला, वडाळा, नेरुळ आणि सीवूड्स स्थानकात काम देखील केले आहे.
विनातिकीट प्रवासामुळे भांडाफोड
अमेयकडे रेल्वेचे ओळखपत्र असल्याने तो रेल्वे नोकरीला लागल्याचा त्याचा समज झाला होता. त्यामुळे लोकलमधून विनातिकीट प्रवास करत होता. मात्र, ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करत असताना त्याला कोपरखैरणे रेल्वे स्थानकात टीसीने पकडले होते.त्यावेळी अमेयने त्याच्याकडे असलेले रेल्वेचे ओळखपत्र दाखवले होते. पण हे ओळखपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रियंकाने फसवणूक केल्याचे अमेयला लक्षात आल्यानंतर त्याने कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४