मुंबई :- रेल्वे विभागात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून एका महिलेने नवी मुंबईत राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाकडून दहा लाख रुपये उकळल्याचा प्रकार झाला आहे. या महिलेने सदर तरुणाला रेल्वेचे बनावट नियुक्ती पत्र तसेच ओळखपत्र देऊन एक महिना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर काम सुद्धा करून घेतले आहे.याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.जुईनगर येथे राहणारा अमेय घाग (२७) यांची उल्हासनगर येथे राहणारी पिंकी उर्फ प्रियंका जाधव या महिलेने फसवणूक केली आहे. जुलै २०२२ मध्ये भावाच्या मैत्रिणीने प्रियंका जाधव बाबत अमेयला माहिती दिली होती.
प्रियंकाने रेल्वे विभागात चांगली ओळख असल्याचे सांगत अनेकांना रेल्वेत नोकरीला लावल्याचे सांगितले होते. तसेच अमेयला देखील रेल्वे विभागात लिपिकाची नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत दहा लाखांची मागणी केली होती. यावेळी अमेयने कागदपत्रांसह ४ लाख ९० हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये प्रियंकाने अमेयच्या व्हॉट्सॲपवर बनावट नियुक्ती पत्र पाठवले होते. त्यामुळे अमेयने उर्वरित ४ लाख ८५ हजार रुपये तिच्या खात्यावर पाठवून दिले होते. यावेळी अमेयची सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कमर्शिअल क्लार्क म्हणून नियुक्ती झाल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सही शिक्का असलेले रेल्वे विभागाचे बनावट ओळखपत्र देखील दिले होते. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रियंका जाधवच्या सांगण्यावरून अमेयने सीएसएमटी, ठाणे, कुर्ला, वडाळा, नेरुळ आणि सीवूड्स स्थानकात काम देखील केले आहे.
विनातिकीट प्रवासामुळे भांडाफोड
अमेयकडे रेल्वेचे ओळखपत्र असल्याने तो रेल्वे नोकरीला लागल्याचा त्याचा समज झाला होता. त्यामुळे लोकलमधून विनातिकीट प्रवास करत होता. मात्र, ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करत असताना त्याला कोपरखैरणे रेल्वे स्थानकात टीसीने पकडले होते.त्यावेळी अमेयने त्याच्याकडे असलेले रेल्वेचे ओळखपत्र दाखवले होते. पण हे ओळखपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रियंकाने फसवणूक केल्याचे अमेयला लक्षात आल्यानंतर त्याने कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.