ग्वालियर: प्रेयसी किंवा प्रियकराला खूश करण्यासाठी तरुण-तरुणी काय करतील, याचा नेम नसतो. मात्र हे करत असताना कधीकधी चुकीचं पाऊलही टाकलं जातं. अशीच एक विचित्र घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून समोर आली आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आपल्याकडे बक्कळ पैसे हवेत, असा विचार करून तरुणाने अनेक शहरांत हैदोस घातला होता. लवकर श्रीमंत होण्यासाठी आरोपी तरुणाने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. मात्र आता तो पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालियर येथील सिरॉल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलीस या घटनेचा तपास करत असताना धक्कादायक माहिती उघड झाली. चोरी झालेल्या वृद्ध महिलेच्या शेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केलं असल्याचं तपासात स्पष्ट झालं. धार्मिक कार्यक्रम असल्याचं सांगत तरुणाने वृद्ध महिलेला एका हॉटेलवर बोलावलं होतं. तिथं गेल्यावर आरोपी तरुणाने महिलेला बांधून ठेवलं आणि तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेत तो तिथून फरार झाला. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने घर गाठलं आणि घडलेला प्रकार आपल्या मुलाला सांगितला.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला.आरोपी तरुण वृद्ध महिलेच्या घराशेजारी एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. पोलिसांनी सदर खोलीच्या मालकाशी संपर्क साधत तरुणाचे आधार कार्ड मिळवले. मात्र त्यावरील मूळ पत्त्यावरही तरुण नसल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एक स्क्युटी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर त्या स्कुटीचा नंबर ट्रेस करत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर इतर काही शहरांतही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं आहे.दरम्यान, मला माझ्या प्रेयसीसोबत लग्न करायचं असल्याने लवकर श्रीमंत होण्यासाठी मी चोऱ्या करत असल्याचा दावा आरोपी तरुणाने केला आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






