धरणगाव:- चारचाकी वाहनातून तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिघ दरोडेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून व तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल एक कोटी ६० लाख रुपयांची रोकड लांबवत्याची सिनेस्टाईल घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ शनिवार, १७ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा पडलेल्या दरोड्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले वाहन हे फैजपूर येथून चोरल्याचे स्पष्ट असून दरोडेखोरांनी पाळत ठेवून नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकल्याचे स्पष्ट आहे.
सिनेस्टाईल एक कोटी ६० लाख लुटले
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंग आहे. शनिवारी कापसाचे पेमेंट करावयाचे असल्याने जळगाव येथील बँकेतून एक कोटी ६० लाखांची रोकड जिनिंगचे कॅशियर यांनी काढले. सोबतीला चालक व जिनिंगमालकाशी संबंधित एक असे तिघे चारचाकी वाहनाने पिंप्री येथे येण्यासाठी निधात्यानंतर शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुसळी फाट्याजवळील निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाखाली लाल रंगाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली व काही क्षणातच स्कॉर्पिओतून तोंडाला मास्कलावलेले ३० ते ३५ वयोगटातील तीन संशयित उतरते व त्यांनी दुर्गेश जिनिंग संबंधित असलेल्या वाहनाची काच फोडून वाहनातील कॅशियर, चालक व अन्य एकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याने तिघे प्रचंड हादरले व काही क्षणात तिघा दरोडेखोरांनी वाहनातील कापडी पिशव्यांमध्ये असलेली एक कोटी ६० लाखांची रोकड घेवून अन्य मारोती इको वाहनाने धूम ठोकली. घटनास्थळापासून काही अंतरावर इको वाहनही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
कार येण्याची वाट पाहिली, दिसताच दिली धडक
हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ कार फैजपूरहून चोरली होती. १७ फेब्रुवारीला पहाटे २.३० वाजता याच कारचा वापर करून चोपड्यात दोन ठिकाणी घरफोडी केली. दुपारी ते मुसळीफाटा येथे येऊन कारची वाट पाहत थांबले. दीड वाजता जळगावकडून येणारी कार दिसताच तिला धडक देत कारमधील व्यक्तींवर हल्ला चढवला. कारमधील योगेश पाटील यांच्यावर चाकूने वार ही केले.
रोज नेली जाते रोकड
लुटले गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, साधारणपणे रोज अशी रोकड जळगावतल्या अॅक्सिस बँक शाखेतून काढून फॅक्टरीवर नेली जाते. या रकमेतून शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार होते. धरणगाव किंवा पिंप्री येथे बँकेची शाखा नसल्याने आणि इतकी मोठी रक्कम तिथे उपलब्ध होत नसल्याने जळगाव शहरात खाते उघडण्यात आले आहे.
टीप देणारे कोण?
या चोरट्यांना पांढऱ्या रंगाच्या या कारमधून दीड कोटी रुपये नेले जाणार आहेत, ही पक्की माहिती होती. वेळही त्यांना माहिती होती. म्हणूनच ते कारची वाट पाहात तिथे थांबले होते. अशी रोकड बँकेतून काढून किती वाजता कोणत्या कारने नेली जाणार आहे हे ज्यांना माहिती असेल त्यांनीच ही टीप या लुटारूंना दिली होती हे उघड आहे. ही टीप देणारे कोण आहेत, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे
पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास
घटनेनंतर धरणगाव पोलिस ठाण्यात जिनिंग कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी तीन्ही कर्मचाऱ्यांची वैयक्तिक चौकशी केली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






