धक्कादायक! थाटामाटात लग्न झालं,नवरीच्या हातावरील मेहंदीचा रंगही उतरला नव्हता, लग्नाच्या पाचव्या दिवशीच नवरीने घेतला पतीचा जीव.

Spread the love

सासू सासऱ्यांना फोन करून दिली माहिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य आलं समोर.

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका घरात अगदी थाटामाटात लग्न झालं होतं. लोक नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत होते. नवरीच्या हातावरील मेहंदीचा रंगही उतरला नव्हता, तेव्हाच तिने लग्नाच्या पाचव्या दिवशीच प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली.

या घटनेनं कुटुंबीयच नव्हे तर परिसरातील लोकही हादरले आहेत.दोहरीघाट पोलीस स्टेशन हद्दीतील उसरी विश्वनाथपूर येथील लवकुश चौहान (वय 24 वर्षे) याचा विवाह आझमगडच्या छतावार गावातील पायल चौहानसोबत 13 फेब्रुवारी रोजी झाला होता. लग्नाचे सर्व विधी आनंदात पार पडल्यानंतर पायल तिच्या सासरच्या घरी आली.त्यानंतर नवरा-बायको दोन दिवस नवीन घरात राहायला आले. दरम्यान, शनिवारी रात्री काही लोकांनी लवकुशला फोन करून आपल्यासोबत नेलं. मात्र, तो सकाळपर्यंत घरी परतला नाही. यानंतर पायलने सासू आणि सासऱ्यांना फोन करून माहिती दिली.

कुटुंबीयांनी येऊन शोधाशोध सुरू केली. रविवारी त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या तलावात सापडला. यानंतर पोलिसांनीही माहिती मिळताच तिथे पोहोचून तपास केला. यासोबतच कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या तपासात काही तासांतच धक्कादायक सत्य समोर आलं.पायलचे दिनेश यादव नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ती तिच्या लग्नामुळे खूश नव्हती. यामुळे पतीच्या हत्येचा कट रचण्यात आला.

प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने तिने पतीचा गळा आवळून खून केला. या हत्येचा खुलासा करताना सीओ दिनेश दत्त मिश्रा यांनी सांगितलं की, मृतदेह सापडल्यानंतर मृताचे वडील घनश्याम चौहान यांनी एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एसपींच्या सूचनेवरून एसओजी टीम, सर्व्हिलन्स पथक आणि पोलीस स्टेशन प्रभारी पथक तैनात करण्यात आलं होतं. काही तासांनंतर पायल, तिचा प्रियकर दिनेश आणि मित्र अभिषेक यादव यांच्याबाबतचं सत्य समोर आलं. दिनेश आणि पायल यांना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार