मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज (२३फेब्रुवारी) पहाटे ३ वाजून ०२ मिनिटांनी हिंदुजा रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीडचे. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. ते एम.ए.एल.एल.बी. झाले होते. एम.ए. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. पण, नोकरीपेक्षा त्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त होता. त्यांनी कोहीनूर इंस्टीट्यूट सुरू केले. जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवयायिक प्रशिक्षण देणे सोपे होईल.
मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे मनपात नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे १९९९ ते २००२ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
वयाच्या ७२ व्या वर्षी ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली.
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.