एरंडोल :- राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका,पिंप्री फाटा आणि पिंपळकोठा येथे अंडरपास बोगदा करण्यात यावा,महामार्गाच्या दोन्ही बाजूस सात मीटर लांबीचे समांतर रस्ते तयार करून गटारी करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरी कृती समितीच्यावतीने अमळनेरनाका येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.शहरातील सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून आंदोलनास पाठींबा दिला.दुपारी भर उन्हात सुमारे चारतास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी महामार्गावरच बैलगाड्या आणि ट्रॅक्टर लावले होते.आंदोलकांनी महामार्गाच्या मध्यभागी मंडप लावून वाहतूक रोखून धरली होती.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन समाप्त करण्यात आले.आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पक्षभेद बाजूला सारून सहभागी झाले होते.राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करतांना अनेक त्रुटी राहिल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ होऊन अनेक निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.अमळनेर नाका,पिंप्रीफाटा आणि पिंपळकोठा गावाजवळ रस्ता पार करण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत.शहरातील अमळनेर नाकालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सहा महिन्यात अनेक अपघात झाले असून आठ ते दहा नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस समांतर रस्त्यांचे काम करण्यात आलेले नाही.समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा खोलाम्बा होऊन वाद निर्माण होत असतात.अमळनेर नाका,पिंप्रीफाटा आणि पिंपळकोठा येथे अंडरपास करण्यात यावा,सामानातर रस्त्यांचे काम करून गटारी करण्यात यावे या मागणीसाठी महामार्ग चौपदरीकरण निवारण नागरी कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या पदाधिका-यांनी अनेक वेळा संबंधित अधिका-यांची भेट घेवून निवेदन दिल्यानंतर देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.आज संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिका-यांनी तसेच नागरिकांनी दुपारी अकरा वाजता महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु केले.राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक आंदोलनस्थळी येवून लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले.

प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र पदाधिकारी आंदोलनावर ठाम राहिले. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांचेशी संपर्क साधून आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्वरित आंदोलनस्थळी येण्याचे सांगितले. आंदोलनात सर्वच राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, व्यावसायिक,नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेतकरी बैलगाडीसह आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गावरच बैलगाडी व ट्रॅक्टर लावण्यात आले होते. तसेच समितीच्या पदाधिका-यांनी महामार्गावरच मंडप उभा करून ठिय्या मांडला होता.आंदोलनामुळे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.शहरातील व्यावसायिकांनी बंद पाळून आंदोलनास पाठींबा देवून सहभाग नोंदवला.

यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.संबंधित अधिका-यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरित पूर्तता न केल्या यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.आंदोलनात माजीमंत्री डॉ.सतीश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने, जिल्हापरिषदेचे माजी सदस्य नाना महाजन,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर, दशरथ महाजन,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, जिल्हासरचिटणीस राजेंद्र शिंदे,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,माजी उपनगराध्यक्ष अशोक
चौधरी,अभिजित पाटील,कुणाल महाजन,संजय महाजन, प्रमोद महाजन,जगदीश ठाकूर,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,राजेंद्र महाजन,दुर्गादास महाजन,आय.जी.माळी,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,परेश बिला,नितीन बिर्ला,

ज्येष्ठ नेते गणसिंग पाटील,अतुल पाटील,प्रा.आर.एस. पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, योगेश महाजन,महात्मा फुले युवा क्रांती मंचचे संस्थापक कैलास महाजन,पंकज महाजन,गणेश महाजन,गोरख चौधरी, सचिन विसपुते,पिंटू राजपूत यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.आंदोलन शांततेत पार पडले.अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील नंदनवाळ,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,शरद बागल,अनिल पाटील,मिलिंद कुमावत,राजेश पाटील, संदीप पाटील,शिवाजी पाटील व त्यांच्या सहका-यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.आंदोलन समाप्त झाल्यानंतर सुमारे एक तासाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






