मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इतिहास रचला. त्याने इंग्लिश संघाच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. अश्विनने बेन डकेटला (२) बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर त्याने जॅक क्रोली (०) आणि त्यानंतर ऑली पोप (१९) यांना बाद करून इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला तंबूमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने बेन स्टोक्स आणि बेन फॉक्सला बाद केले आणि डावात पाच बळी पूर्ण केले. आतापर्यंत कसोटीत त्याने ३६ वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणारा तो भारताचा गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम रचताना त्याने अनिल कुंबळेला मागे सोडले. कुंबळेने ३५ वेळा असे केले.
त्याचबरोबर अश्विनने एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सर रिचर्ड हॅडलीची बरोबरी केली. आता शेन वॉर्न (३७ वेळा) आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (६७ वेळा) अश्विनपेक्षा एका डावात पाच विकेट घेण्याच्या बाबतीत पुढे आहेत. अश्विनने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या आणि या कसोटीत त्याने एकूण नऊ बळी घेतले आहेत. एवढेच नाही तर २०१९ मध्ये सुरू झालेल्या जागतिक कसोटी विजेतेपदाच्या दरम्यान सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनच्या विक्रमाचीही बरोबरी केली. लायनने १० वेळा असे केले आहे आणि अश्विनने आता १० वेळा डब्ल्यूटीसीमध्ये एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय, त्याने आतापर्यंत जागतिक कसोटी विजेतेपदाच्या दरम्यान १७४ बळी घेतले आहेत आणि सर्वाधिक बळींच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अश्विनने पॅट कमिन्सला मागे सोडले, त्याच्या नावावर १७२ विकेट आहेत. लायनने डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर १८४ विकेट आहेत. अश्विनने १०० वी कसोटी खास बनवत अनेक विक्रम केले आहेत. अश्विनने आतापर्यंत कसोटीत ५१६ विकेट्स घेतल्या आहेत.
यासोबतच त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ आणि टी-२०मध्ये ७२ विकेट्स आहेत. याआधी जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. त्याच वेळी, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो मुरलीधरन (८००) आणि वॉर्न (७०८) नंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
धर्मशाला कसोटीबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ४७७ धावांवर संपला. टीम इंडियाने २५९ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ १९५ धावा करू शकला. हा सामना एक डाव आणि ६४ धावांनी जिंकण्याबरोबरच भारताने मालिकाही ४-१ ने जिंकली.
अश्विनने या कसोटीच्या दोन्ही डावात नऊ विकेट घेतल्या आणि १२८ धावा केल्या. एखाद्या खेळाडूची त्याच्या १०० व्या कसोटीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला. मुरलीधरनने २००६ मध्ये बांगलादेशविरुद्ध १००वी कसोटी खेळली होती. त्यानंतर त्याने चितगावमध्ये १४१ धावांत नऊ विकेट घेतल्या.
यासह अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ११४ विकेट्स घेतल्या आहेत. एका संघाविरुद्ध भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक बळींच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. इंग्लंडपूर्वी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धही ११४ विकेट घेतल्या होत्या.
अश्विनने दुसऱ्या डावात पाच विकेट घेत एका खास क्लबमध्ये प्रवेश केला. १००व्या कसोटी डावात पाच विकेट घेणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. शेन वॉर्नने २००२ मध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १००व्या कसोटीत १६१ धावांत सहा बळी घेतले होते. त्याचवेळी कुंबळेने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. मुरलीधरननेही आपली १००वी कसोटी खास बनवली आहे.
कुलदीप यादवला सामनावीर तर यशस्वी जैस्वालला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४