खळबळजनक! दोघांचे प्रेमसंबंध आईच्या लग्नाला विरोध,म्हणून प्रेमीयुगलने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन.

Spread the love

आर्वी :- तालुक्यातील ईटलापूर शिवारातील विहिरीमध्ये युवक-युवतीचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवार 11 रोजी सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर चौकशीअंती प्रेमसंबंधातून दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.मंगेश राऊत (27) व वैष्णवी राऊत (21) दोघेही रा. बाभूळगाव अशी मृतांची नावे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मंगेशच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना प्रेम प्रकरणाची माहिती होती. परंतु, या लग्नाला आईचा विरोध होता.

अशातच महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी गावात महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याने मंगेश या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता काही साहित्य आणायचे आहे, असे सांगून तो गावातून बाहेर पडला. दुसर्‍या दिवशी रविवारपर्यंत मंगेश घरी पोहचलाच नसल्याने त्याच्या आईने आर्वी पोलिसात तक्रार नोंदविली. अखेर सोमवारी सकाळी 11 वाजता ईटलापूर शिवारातील रणजित घोडमारे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली.त्यानुसार, पोलिसांसह मंगेशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत मंगेश आणि वैष्णवी या दोघांचेही मृतदेह आढळून आले.

ज्या दिवशी मंगेश गावातून निघूनगेला होता तेव्हापासून वैष्णवीही घरी परतली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी माहिती मिळताच आर्वी पोलिस ठाण्याचे वाल्मीक बांबर्डे, जाधव, किशोर साठवणे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार अरविंदकुमार रतलाम यांच्या मार्गदर्शनात वाल्मीक बांबर्डे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार