बंगळुरू – बिहारमधील मुझफ्फरपूर बालिका सुधारगृहाचं प्रकरण लोक अजूनही विसरले नाहीत. अल्पवयीन मुली आणि तरुणींवरील अत्याचाराच्या या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अनाथाश्रमाच्या नावाखाली मोठं रॅकेट चालवलं जात असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्सचे (NCPCR) अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी सांगितलं की एनसीपीसीआरची टीम बंगळुरूच्या अश्वथनगरमध्ये (अमरज्योती लेआउट) बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या अनाथाश्रमात पोहोचली होती. अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलींशी झालेल्या संभाषणातून धक्कादायक खुलासे झाल्याचं ते म्हणाले.प्रियांक यांनी बंगळुरूमधील बेकायदेशीर अनाथाश्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘बंगळुरूच्या अश्वथनगरमध्ये एक अनाथाश्रम बेकायदेशीरपणे चालवले जात आहे. आम्ही एका बेकायदेशीर अनाथाश्रमाची चौकशी करत होतो. तिथं 20 मुलींना ठेवण्यात आलं होतं.
त्यातल्या काही अनाथ होत्या. त्यांनी (अनाथाश्रमाच्या संचालकांनी) आम्हाला तपास पूर्ण करू दिला नाही, त्यामुळे तिथे राहणाऱ्या मुलींची नेमकी संख्या सांगता येणार नाही. आम्ही मुलींशी बोललो. आमच्या टीमच्या महिला सदस्यांनी मुलींशी संवाद साधला. या अनाथाश्रमातील मुलींचं लग्न परदेशात लावण्याचं आमिष दाखवलं जात असल्याची माहितीही समोर आली आहे. एनसीपीसीआरची टीम तिथे गेल्यावर काही मुलींनीच तिथली सत्य परिस्थिती सांगितली आहे.
कुवेतमध्ये ठरवते लग्न’अनाथाश्रमात राहणाऱ्या एका मुलीनं सांगितलं की इथली एक उच्चपदस्थ महिला कुवेतमध्ये लग्न लावून देते. मी पाहिलं की तिथे आखाती देशांमध्ये लग्न करण्यासाठी मुलींना तयार केलं जातं. यामध्ये मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे, जे लग्नाच्या बहाण्याने मुलींना आखाती देशांमध्ये पाठवतात ,’ असं प्रियांक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
गंभीर आरोप
प्रियांक म्हणाले, ‘आज (15 मार्च 2024) बंगळुरूमधील एका बेकायदेशीर अनाथाश्रमाच्या तपासणीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलींना शाळेत पाठवलं जात नाही, संपूर्ण अनाथाश्रमात खिडक्या किंवा व्हेंटिलेटर नाहीत आणि मुलींना पूर्णपणे बंदिस्त ठेवण्यात आलंय. अनाथाश्रमात 20 मुली होत्या. इथं येण्यापूर्वी काही मुली शाळेत जात होत्या, मात्र त्यांचं शिक्षण थांबविण्यात आलंय.’