“देव तारी त्याला कोण मारी”एक विहिरीत पडला, दुसरा वीजेच्या बोर्डाला चिकटला; सुदैवाने घडला चमत्कार…

Spread the love

बीड :- देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या दोन घटना बीडमधून नुकत्याच समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दैव बलवत्तर म्हणून दोन चिमुकले थोडक्यात बचावले. एक खेळताना वीजेच्या बोर्डला चिकटला. तर दुसरा मुलगा खेळताना विहिरीत पडला. मात्र, सुदैवाने या दोघांचेही प्राण वाचले आहेत. सुदैवाने नातेवाईकांनी वेळीच पाहिल्यानं ही दोन्ही बालकं बचावली.

बीड तालुक्यातील गाडेवाडी येथील प्रकाश वावरे यांचा दोन वर्षाचा मुलगा तेजस्वी खेळत असताना मंदिराजवळच्या विहिरीत पडला. विहिरीत चार-पाच फूट पाणी होतं. मुलगा जवळपास दिसत नसल्याने आईने आरडाओरड सुरु केली. यानंतर मुलाचे वडील प्रकाश शेषराव वावरे यांनी शोधाशोध सुरू केली. बाजूलाच असलेल्या विहिरीत त्यांना तेजस्वी गटांगळ्या खाताना दिसला. त्यांनी उशीर न करता लगेचच विहिरीत उडी घेतली आणि त्याला बाहेर काढलं. आईने वेळीच आरडोओरड केल्याने आणि वडिलांनी विहिरीतून बाहेर काढल्याने या चिमुकल्याचा जीव वाचला आहे.

तर, दुसरी घटना बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरातून समोर आली आहे. खंडेश्वरी मंदिर परिसरात राहणारा आर्यन नितीन गालफाडे हा दहा वर्षाचा मुलगा घरामध्ये लाईटच्या बोर्डाला चिकटला होता. यावेळी बाजूलाच असलेल्या आर्यनची चुलती पुजा राहूल गालफाडे यांनी त्याला प्रसंगावधान दाखवलं. त्यांनी हातातल्या बेलण्यानं त्याला बोर्डापासून दूर केलं. यामुळे या घटनेत त्याचे प्राण वाचवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार