धक्कादायक! वडील आपले लग्न बॉयफ्रेंडशी करू देत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीने बॉयफ्रेंडला हाताशी धरुन वडील अन् भावाला संपवलं

Spread the love

जबलपूर :-(मध्य प्रदेश) येथे 15 मार्च 2024 ला करण्यात आलेल्या रेल्वे कर्मचारी आणि आठ वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. या हत्येप्रकरणी आरोपी मुकुल सिंह याच्यासोबत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या 16 वर्षीय मुलीचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.पोलीस या दोघांचा शोध घेत आहे.सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे मिलेनियम कॉलनीतील राजकुमार विश्वकर्मा (वय 52) आणि त्यांचा मुलगा तनिष्क यांची त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या मुकुल सिंहने 15 मार्च 2024 रोजी निर्घृण हत्या केली. मृत राजकुमार हे रेल्वे विभागात अधीक्षक पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी वैष्णोदेवी यात्रेदरम्यान त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. ते सध्या त्यांची 16 वर्षांची मुलगी व व आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होते. मात्र, आता त्यांच्या हत्येमध्ये मुलगीच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

अशी करण्यात आली हत्या

आरोपी मुकुल सिंह व मृत राजकुमार यांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. या दोघांच्या लग्नाला राजकुमार यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांची व त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाची हत्या मुलीने केल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येच्या दिवशी म्हणजेच 15 मार्चला मुकुल हा पहाटे तीनच्या सुमारास राजकुमार यांच्या घराभोवती गॅस कटर आणि पॉलिथीन खांद्यावर घेऊन फिरत होता. यानंतर त्याने राजकुमार यांच्या घराच्या मागील बाजूला असणारे दार हे गॅस कटरने कापले, व घरामध्ये प्रवेश केला. घटनास्थळी बोटांचे ठसे सापडू नयेत, यासाठी त्याने हातामध्ये मोजे घातले होते. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुलनं राजकुमार व त्यांच्या मुलाच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. तसेच प्रेयसीच्या म्हणजेच राजकुमार यांच्या मुलीच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे नष्ट केले. हत्या केल्यानंतर मुकुल व त्याची प्रेयसी जवळपास नऊ तास घटनास्थळी होती.

मुलीने तिच्या काकांना केला व्हॉईस मेसेज

वडिलांची व भावाची हत्या झाल्याची माहिती मुलीनी तिच्या इटारसी येथे राहणाऱ्या काकांना मोबाईलवर व्हॉईस मेसेज करून दिली. मुकुल सिंहने ही हत्या केल्याचीही तिनं व्हॉईस मेसेजमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर मुलीच्या काकांनी ही माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मुकुल व त्याची प्रेयसी घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना राजकुमार विश्वकर्मा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला. तर, त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह फ्रीजमध्ये पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी या घटनेतील आरोपी व त्याच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

आरोपीचा सुगावा लागेना

घटनेला जवळपास चार दिवस होत आले असले तरी अद्याप जबलपूर पोलिसांना हत्या करणारा आरोपी व त्याच्यासोबतच्या मुलीचा अद्याप सुगावा लागलेला नाही. गुन्हा करून दोघेही पळून गेले असून जबलपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र ते दोघे सतत त्यांचे ठिकाणं बदलत आहेत. या दोघांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याची पाच पथके तैनात करण्यात आलीत. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आलेत. पण आरोपी पोलिसांना चकवा देत प्रत्येक वेळी ठिकाणं बदलत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मुलीवर संशय वाढला

जबलपूर दुहेरी हत्याकांडात आरोपी मुकुल तसेच मृताच्या मुलीची भूमिकाही संशयास्पद दिसतेय. आतापर्यंत समोर आलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृताची मुलगी आरोपीच्या सोबत जात असल्याची दिसतेय. त्यामुळे या दुहेरी हत्याकांडात तिचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पहिल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकुल हा घटनास्थळाच्या जवळ पार्क केलेल्या लाल रंगाची दुचाकी (MP20 SE 3291) वर बसलेला दिसतोय. त्यानंतर पाच मिनिटांनी मृताची अल्पवयीन मुलगी म्हणजेच त्याची प्रेयसी घराबाहेर येते आणि मुकुलसोबत दुचाकीवरून बसून पळून जाते. दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकुल हा त्याच्या प्रेयसीसोबत रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेला दिसतोय. तिथे तो त्याच्या प्रेयसीला स्टेशनच्या बाहेर सोडून आतमध्ये जातो, तेव्हा त्याची प्रेयसी आजूबाजूला बघताना दिसतेय. तिसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकुल हा प्रेयसीला घेऊन मदन महल स्टेशनमध्ये जाताना दिसतोय. काही वेळ वाट पाहिल्यानंतर पोलिसांना चकवण्यासाठी तो पुन्हा स्टेशनच्या बाहेर येतो, व रिक्षामध्ये बसून बसस्थानकावर जाताना दिसतोय. चौथ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकुल हा प्रेयसीचा हात धरून दीनदयाळ बसस्थानक चौकात जात असताना दिसतोय.

पुण्यातील एटीएममधून काढले पैसे

मुकुल व त्याची प्रेयसी दोघेही बसमध्ये बसून सिहोरमार्गे कटनी येथे पोहोचले, व तेथून रेल्वेने पुण्यामध्ये आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील एका एटीएममधून आरोपीने पैसेही काढले आहेत. पोलिसांचं पथक त्यांच्या मागावर आहे.दरम्यान, आरोपी मुकुल हा मृत राजकुमार याच्या मुलीने केलेल्या तक्रारीमुळेच तुरुंगात गेला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर ‘किलर’चा डीपी टाकला होता. मुकुलनं राजकुमार यांच्या हत्येचा कट हा त्यांच्या मुलीसोबतच तयार केला होता. याचे एकमेव कारण होतं की, दोघांना लग्न करायचे होते. पण त्यांच्या लग्नाला राजकुमार यांचा विरोध होता. त्यानंतर त्यांनी राजकुमार यांची हत्या करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सोशल मीडियावरून मागितलं होतं. पोलीस तपासात या गोष्टी समोर आल्या आहेत. आता मुकुल व त्याला हत्या करताना साथ देणाऱ्या त्याच्या प्रेयसीला पकडल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार