कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी बनावट कागदपत्र तयार करुन दिल्या पाच शिक्षकांना नेमणुका, शिक्षणाधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

नागपूर :- बनावट कागदपत्रे सादर करून पाच शिक्षकांना नेमणुका दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी राजश्री मधुकर घोडके (वय ३४) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण अधिकारी गुलाब सय्यद व सुलोचना पटारे, कनिष्ठ सहायक चिमाजी धनवळे व जे. के. वाघ या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालय, नागापूर येथील शिक्षक संपत आदेशराव शिरोळे व अश्र्विनी दिगंबर सप्रे, नूतन मराठी प्राथमिक विद्यालय, मिरजगाव (ता. कर्जत) येथील नीलेश उत्तम बुद्धिवंत व दीपा बजरंग रणसिंग, श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर पाथर्डी शाळेचे शिक्षक बंडू भीमराव गाडेकर अशा तीन शाळेतील पाच शिक्षकांना वैयक्तिक मान्यतेची कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखल करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शिक्षक म्हणून देण्यात आलेल्या ऑर्डरवर स्वत:च्या स्वाक्षरी व खोटा जावक क्रमांक टाकून पाच नेमणुका देण्यात आल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांसह चार जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्राथमिक शिक्षण विभागाकडून या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती.चौकशी अहवालात बनावट कागदपत्रांद्वारे नियुक्ती देण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक कपिले गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार