
दौसा – राजस्थानमधील दौसा येथे एका महिला डॉक्टरने रुग्णाच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या मृत्यूनंतर डॉक्टरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या महिला डॉक्टरने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने एक सुसाईड नोटही लिहिली आहे ज्यामध्ये ‘मी कोणालाही मारले नाही. कदाचित माझा मृत्यू माझे निर्दोषत्व सिद्ध करेल’ असा निर्दोष असल्याचा दावा सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने केला आहे.
अर्चना शर्मा असे या डॉक्टरचे नाव आहे. गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर लावण्यात आलेल्या हत्येच्या आरोपामुळे वैतागून डॉ.शर्मा यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद रुग्णालयात सोमवारी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांसह इतरांनी मृतदेह रुग्णालयाच्या गेटवर ठेवून ठिय्या आंदोलन केले. महिलेच्या पतिने निष्काळजीपणाचा आरोप करत महिला डॉक्टर आणि रुग्णालयाच्या संचालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, माझे पती आणि मुलांवर खूप प्रेम आहे. मी मेल्यानंतर त्यांना त्रास देऊ नका. मी काहीही चुकीचे केले नाही आणि कोणालाही मारले नाही. पीपीएच ही एक गुंतागुंत आहे, डॉक्टरांचा इतका छळ करणे थांबवा. कृपया निष्पाप डॉक्टरांना त्रास देऊ नका. माझ्या मुलांना आईची उणीव भासू देऊ नका.”
दरम्यान, अर्चना यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती डॉ. सुनित उपाध्याय यांनी पोलिसात एफआयआर नोंदवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.