मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह केकेआरने आरसीबीविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवली. आरसीबीने शेवटचा केकेआरविरुद्ध २०१५ मध्ये विजय मिळवला होता. केकेआरने आपला विजयी रथ पुढे दामटला आणि विराट कोहलीची संथ अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरवली.
आयपीएल २०२४ च्या १०व्या सामन्यात, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १९ चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. संघाच्या खात्यात चार गुण आहेत तर आरसीबी दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. आरसीबीच्या गोलंदाजांवर निशाणा साधत दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी भेदली. नरेन २२ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्याने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा काढल्या.
या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला. २९ चेंडूत अर्धशतक झळकावून तो तंबूमध्ये परतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने या फलंदाजाला आपला बळी बनवले. त्याने कर्णधारासोबत ७५ धावांची भागीदारी केली. रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आरसीबीविरुद्ध २४ चेंडूंचा सामना केला आणि १६२.५० च्या धावगतीने ३९ धावा केल्या. तो नाबाद राहिला. आरसीबीकडून विजयकुमार, मयंक डागर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार कामगिरी केली. घरच्या मैदानाचा फायदा घेत संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १८२ धावा केल्या आणि विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीमुळे १८३ धावांचे लक्ष्य ठेवले. संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ग्रीन २१ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसेलने ग्रीनला आपला बळी बनवले.
संघाला तिसरा धक्का मॅक्सवेलच्या रूपाने बसला, ज्याला नरेनने आपला बळी बनवले. या सामन्यात रजत पाटीदार आणि अनुज रावत प्रत्येकी तीन धावा करून बाद झाले. पुन्हा एकदा पाटीदार फ्लॉप ठरला. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोहलीसोबत सहाव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर सुनील नरेनला एक यश मिळाले. हर्षित राणाने प्रत्येकी दोन बळी घेतले तर सुनील नरेनला एक यश मिळाले.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. तो आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेल (२३९) आणि एबी डिव्हिलियर्स (२३८) यांना मागे टाकले आहे. कोहलीच्या नावावर २४१* षटकार आहेत. तीन षटकार मारत त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलमधील ५२ वे अर्धशतक झळकावले. त्याने ८३ धावांची नाबाद खेळी केली.
सुनील नरेनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. शनिवारी लखनौ विरुद्ध पंजाब सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर रंगणार आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४