मुलीने आईच्या बॅंक खात्यातून मित्राच्या मदतीने परस्पर काढले पैसे,आई रागवेल या भितीतून मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून,अन् केला बनाव.

Spread the love

वडगाव शेरी :- मुलीने मित्राच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा मुलीने बनाव रचला. हा धक्कादायक प्रकार वडगाव शेरी येथे घडला आहे.

आई रागवेल या भितीतूनहा खून केल्याचे समोर आले आहे.

नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलिस तपासात खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे.मंगल संजय गोखले (वय 45, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मृत महिलेचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (वय 42, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलीसह तिच्या मित्राविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय 18, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल गोखले यांच्या बॅंक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर पैसे काढले. ही बाब आईला समजल्यानंतर ती रागवेल, अशी तिला भीती होती. तिने आई झोपेत असताना तिच्या मित्राला घरातील हातोडा दिला. यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तसेच, मुलगी योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले.हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार