सोलापूर : नांदणी- बरुर (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील चनबसप्पा रेवप्पा सलगरे (रा. सलगर वस्ती, बरूर) याने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नी व तिच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. या प्रकरणी मयत श्रीकांत अनिल नरोटे (वय २२, रा. नरोटे वस्ती, नांदणी ) याचे वडील अनिल नरुटे यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी चनबसप्पा सलगरे याला पत्नी व श्रीकांत या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा खूप दिवसांपासून संशय होता.
यापूर्वी देखील त्या दोघांना समजावून सांगण्यात आले होते. पण, त्यांच्यातील जवळीकता कमी झालेली नव्हती. बुधवारी (ता. १०) दुपारी तीनच्या सुमारास संशयित आरोपी चनबसप्पा याने अनिता व श्रीकांत या दोघांना शेतात एकत्र पाहिले आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने कुऱ्हाडीने पत्नी अनिता व श्रीकांत या दोघांच्या तोंडावर, मानेवर घाव घातले. त्यातच त्या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी गेल्यावर चनबसप्पा याच्यासह कल्लप्पा सलगरे, लक्ष्मण चंदू सलगरे, उमेश सुरेश सलगरे व नागप्पा माने या पाच जणांनी विरोध केल्याचेही अनिल नरुटे यांच्या फिर्यादीत नमूद असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, सहायक फौजदार संदीप काशीद, हवालदार अविनाश पाटील, श्रीकांत भुरजे, दिनेश पवार, सागर चव्हाण, कैलास राऊत, नाना अवघडे, विशाल कर्नाळकर, कविता बिराजदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला. यातील मुख्य संशयित आरोपी चनबसप्पा पळून जाण्याच्या तयारी असताना त्याला सोलापूर शहराजवळील सलगर वस्ती परिसरातून अटक करण्यात आली.आता इतर चार संशयितांच्या शोधासाठी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री. हुले करीत आहेत.
दोन वर्षांपासून सांगूनही ऐकले नाही अन् शेवटी…
नांदणी- बरूर शिवारात सलगरे व नरोटे वस्त्यांवर मयत श्रीकांत नरोटे व अनिता सलगरे हे दोघे राहायला होते. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय दोन वर्षांपूर्वीच गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी चनबसप्पाला (मयत अनिताचा पती) आला होता. त्यानंतर वेळोवेळी त्याने स्वत: व नातेवाईकांना घेऊन दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीही फायदा झाला नाही. बुधवारी दोघांच्याही पाळतीवर असलेल्या चनबसप्पाला दोघेही एकत्रित दिसले आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने त्या दोघांचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पण, दोघांनाही सांगून त्यांनी ऐकले नाही आणि शेवटी दोघांचाही असा अंत झाला.