
नांदेड – नांदेड पोलिस दलातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकास 11 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. या पोलीस उपनिरीक्षकाने गुन्ह्यात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी 11 हजार रुपयाच्या लाचे मागणी केली होती.
शेख नजीर हुसेन आमिर हजमा असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एसीबीने कारवाई करत हुसेन यास अटक केली आहे.
हुसेन यांनी तक्रारदाराच्या मामा विरुद्ध उमरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणून आणि गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे. लाचेचा हा प्रकार समोर आल्यानंतर नांदेड पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.